नवी दिल्ली : अलीकडेच आसिम मुनीर त्यांच्या विधानामुळे पाकिस्तानमध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरात ट्रोल झाले. लोकांनी एकच गोष्ट सांगितली की, जर दोन देश एकाच वेळी स्वतंत्र झाले आणि त्यापैकी एक देशाने मेहनतीने, योग्य धोरणांनी आणि दूरदृष्टीने ‘फरारी’सारखी अर्थव्यवस्था घडवली, तर दुसरा देश आजही ‘डंपर’च्या स्थितीत आहे, तर ही त्यांची स्वतःची अपयशाची कबुली आहे, असे विधान करत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी (२२ ऑगस्ट) नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात पाकिस्तानच्या लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या विधानावर जोरदार टोला लगावला.
राजनाथ सिंह म्हणाले, “मी असीम मुनीर यांच्या या वक्तव्याला केवळ ट्रोल करण्यासारखा विनोद समजत नाही, तर त्याला एक ‘स्वीकारोक्ती’ मानतो. जर आपण या वक्तव्यामागे लपलेल्या गंभीर संकेतांकडे दुर्लक्ष केलं, तर ते आपल्यासाठी चिंतेचं कारण ठरू शकतं. पण जर आपण या इशाऱ्याला गांभीर्याने घेतलं आणि आधीपासूनच तयारी केली, तर भारत अशा कोणत्याही धोक्याला तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम आहे.”
पुढे ते म्हणाले,” पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे पाकिस्तान जन्मापासूनच ज्या लुटारू मानसिकतेचा बळी आहे, त्याकडे लक्ष वेधले आहे. मला असं वाटतं की, पाकिस्तान लष्कराचा हा भ्रम आपण मोडून काढायला हवा. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे त्यांच्या मनात असा भ्रम निर्माण व्हायला नको होता, पण आपल्याला हे निश्चित करावं लागेल की, भारताची समृद्धी, आपली संस्कृती, आर्थिक प्रगती, यासोबतच आपली संरक्षणक्षमता आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी लढण्याची भावना याही तितक्याच बळकट राहिल्या पाहिजेत. आपल्याला हेही सुनिश्चित करावं लागेल की आपल्या सभ्यतेमध्ये, आपल्या राष्ट्रात, लढण्याचं बळ कायम राहावं.”
राजनाथ सिंह म्हणाले, “जेव्हा आपण आपल्या मुलांना, म्हणजेच पुढच्या पिढीला, विज्ञान, गणित, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम फिजिक्स आणि अंतराळ संशोधन यामध्ये पुढे नेतो, त्यांना या विषयांचे शिक्षण देतो, तेव्हा हेही तितकेच आवश्यक ठरते की प्रत्येक नागरिकाच्या, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात राष्ट्राच्या संरक्षणाचा संकल्पही जिवंत असावा. आपले युवक केवळ वैज्ञानिकच बनू नयेत, तर त्यांच्या मनामध्ये ‘योद्धा’सारखी मानसिकताही असावी. ही वृत्ती त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात पुढे जाण्यास उपयुक्त ठरेलच, पण समाज आणि देशाच्या सुरक्षेसाठीही ती आवश्यक आहे.”
पुढे राजनाथ सिंह म्हणाले, “जर तुमची संरक्षण व्यवस्था मजबूत असेल, तर कोणताही शत्रू, कोणताही विरोधक, तुमच्या समृद्धीकडे डोळा उचावून पाहण्याची हिम्मत करणार नाही, किंवा तुम्हाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणूनच मी पूर्ण जबाबदारीने हे सांगू इच्छितो की, संरक्षणावरील खर्च हा विकास खर्चाचाच एक अविभाज्य भाग आहे. जेव्हा देशाच्या सुरक्षेवर आघात होतो, तेव्हा देशाचा विकास निश्चितच मागे राहतो. देशाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान होतं, आणि देशातील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेवरही परिणाम होतो. म्हणूनच मी असं मानतो की संरक्षणावर होणारा खर्च, अशा प्रकारच्या हानीला रोखतो आणि देशाच्या सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक आहे.”
राजनाथ सिंह म्हणाले,“हा असा काळ आहे, की आपल्याला आव्हानांमुळे चिंतीत होण्याऐवजी, त्यामधील संधी ओळखाव्या लागतील. तेव्हाच येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपण सर्वजण मिळून भारताला केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक नाही, तर तंत्रज्ञाननिर्माता आणि या क्षेत्रातील जागतिक नेता बनवू शकतो. भारतीय अर्थव्यवस्थेची जी वेगवान रेल्वे सुरू झाली आहे, त्यामध्ये आपण सर्वजण सहप्रवासी आहोत. तिचं पुढचं स्थानक म्हणजे वाढ, समृद्धी आणि आनंद हे दरवाजे दोन्ही बाजूंनी उघडतील. त्यामुळे हा योग्य वेळ आहे की आपण भारताच्या आर्थिक प्रवासाशी जोडले जावं. माझा ठाम विश्वास आहे की सुरक्षित, समावेशक आणि शाश्वत विकासाचं समाधान भारतातूनच निर्माण होईल. हे माझं अढळ मत आहे.”