नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक विजयादशमी महोत्सवासाठी यंदा एका विशेष आमंत्रित अतिथीची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आगामी १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विजयादशमी महोत्सवात माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.असत्यावर सत्याचा विजय आणि शक्तीच्या उपासनेचे प्रतिक म्हणून संघात विजया दशमी (दसरा) उत्सवाला फार म्हत्व आहे. तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावरच डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी १९२५ मध्ये नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. त्यामुळे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विजयादशमी महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तसेच हा संघाचा स्थापना दिवसही असतो. या प्रसंगी संघ प्रमुख मोहन भागवत हे देश व समाजाशी संबंधित विविध समसामयिक मुद्द्यांवर संबोधित करतात. राम नाथ कोविंद यांची उपस्थिती विशेष महत्त्वाची मानली जात आहे, कारण ते देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर कार्यरत होते. त्यांना संघाच्या व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले जाणे हे स्वतःमध्ये गौरवाचे लक्षण मानले जात आहे.
या कार्यक्रमात हजारो स्वयंसेवक पारंपरिक गणवेशात संघाच्या शाखा पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर करतील तसेच संघाच्या विचारांचा प्रसार करणारे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातील. गेल्या काही वर्षांत संघाच्या व्यासपीठावर उपस्थित राहणारे राम नाथ कोविंद हे दुसरे माजी राष्ट्रपती आहेत. यापूर्वी, २०१८ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही संघाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यासंदर्भात माहिती देताना संघाच्या प्रचार विभागाने सांगितले की, “देशाच्या माजी राष्ट्रपतीसारख्या गरिमामय व्यक्तिमत्त्वाचा या कार्यक्रमात सहभाग होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय जागृतीला अधिक बळकटी देणारा ठरेल.” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलीय.