२२७ जागांपैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव असून, त्यात ८ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमाती, ३१ मागासवर्गीय आणि ७४ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव
मुंबई : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ एकसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार २२७ प्रभागांपैकी निर्धारित जागांसाठी आरक्षण निश्चिती व सोडत काढण्यात आली. वांद्रे (पश्चिम) परिसरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोडतीप्रसंगी चिठ्ठया टाकून जागांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार आरक्षण निश्चिती व सोडत प्रक्रिया आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. सदस्य संख्या, आरक्षणाची परिगणना, आरक्षण चक्रानुक्रमे फिरविणे, अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित प्रभाग निश्चित करणे, महिलांचे आरक्षित प्रभाग निश्चित करणे, महिला आरक्षणाची सोडत काढणे याबाबतची सविस्तर माहिती गगराणी यांनी दिली. त्यानंतर आरक्षण निश्चिती व सोडतीचा प्रारंभ झाला. सोडती दरम्यान प्रभाग क्रमांकाची नावे लिहिलेल्या चिठ्ठया काढण्याची कार्यवाही ‘एच पश्चिम’ विभागात असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या खार येथील लक्ष्मीनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत) नियम, २०२५ च्या नियम क्रमांक ९ नुसार आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्याच्या प्रयोजनार्थ ही पहिली निवडणूक आहे. या नियमातील विविध तरतुदीनुसार, अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित प्रभाग निश्चित करण्यात आले.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग निश्चिती : अनुसूचित जातीच्या जागांच्या आरक्षणाचे वाटप ‘बृहन्मुंबई महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत) नियम, २०२५’ च्या नियम क्रमांक ४ मधील तरतुदीनुसार करण्यात आले. प्रभागातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची प्रभागाच्या एकूण लोकसंख्येशी असलेली टक्केवारी ज्या प्रभागात सर्वाधिक आहे, त्या प्रभागापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने सर्व प्रभागांची मांडणी करण्यात आली. अनुसूचित जातीकरिता १५ जागा थेट आरक्षित असून अनुसूचित जातीच्या महिलांकरिता ८ प्रभाग सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले.
अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभाग निश्चिती : अनुसूचित जमातीच्या जागांच्या आरक्षणाचे वाटप ‘बृहन्मुंबई महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत) नियम, २०२५’ च्या नियम क्रमांक ४ मधील तरतुदीनुसार करण्यात आले. प्रभागातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची प्रभागाच्या एकूण लोकसंख्येशी असलेली टक्केवारी ज्या प्रभागात सर्वाधिक असेल, त्या प्रभागापासून सुरुवात करुन उतरत्या क्रमाने सर्व प्रभागांची मांडणी करण्यात आली. अनुसूचित जमातीकरिता २ जागा थेट आरक्षित असून अनुसूचित जमातीच्या महिलांकरिता १ प्रभाग सोडतीद्वारे निश्चित करण्यात आला.
नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग निश्चिती : नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरीता ‘बृहन्मुंबई महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत) नियम, २०२५’ च्या नियम क्रमांक ७ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा वाटप करण्याची पद्धत विहित करण्यात आली आहे. या नियमातील तरतुदीनुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरीता निश्चित केलेल्या संख्येइतक्या जागा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरीता आरक्षित झालेले प्रभाग वगळून उर्वरित २१० प्रभागांमधून सोडत काढून देण्यात आल्या. या ६१ जागा सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या. या पैकी ३१ जागा महिलांसाठी सोडतीद्वारे निवडण्यात आल्या.
सर्वसाधारण महिलांकरिता जागांचे आरक्षण व सोडत : एकूण २२७ प्रभागांपैकी अनुसूचित जाती (१५ जागा), अनुसूचित जमाती (२ जागा) आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (६१ प्रभाग) यांचे एकूण ७८ प्रभाग वगळून उर्वरित १४९ प्रभागांमधून सर्वसाधारण महिलांसाठी ७४ प्रभागांची सोडतीद्वारे आरक्षण निश्चिती करण्यात आली. सोडतीसाठी चिठ्ठया टाकण्याची कार्यपद्धती सर्व उपस्थित नागरिक / प्रतिनिधी यांच्या समक्ष पूर्ण करण्यात आली. उर्वरित एकूण ७५ प्रभाग हे सर्वसाधारण अराखीव राहणार आहेत. प्रभागनिहाय बिनराखीव जागांचा तपशिल अखेरिस देण्यात आला.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य निवडणूक अधिकारी विजय बालमवार, महानगरपालिकेचे सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, उपायुक्त (परिमंडळ – ३) विश्वास मोटे, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे, ‘एच पश्चिम’ विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पल्लेवाड, उप निवडणूक अधिकारी अशोक मासाळ यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व नागरिक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.