अजित डोभाल यांच्यानंतर परराष्ट्रमंत्री जयशकंरही रशियाच्या दौऱ्यावर

0

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादल्यानंतर भारत आणि रशियामधील संबंध खूप जवळचे होत आहेत. अलिकडेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी रशियाला भेट दिली आणि त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन तसेच मॉस्कोमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांना भेटले. आता भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर लवकरच रशियाला भेट देणार आहेत आणि तेथे ते रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांना भेटणार आहेत.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, २१ ऑगस्ट रोजी मॉस्कोमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि सहकार्यावर चर्चा केली जाणार आहे. यासोबतच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केली जाईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देऊ शकतात. अशा परिस्थितीत दोन्ही नेत्यांच्या बैठकीत पुतिन यांच्या भेटीची तयारी देखील होऊ शकते.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा रशिया दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये काही कटुता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादल्यानंतर ही कटुता निर्माण झाली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल आणि युक्रेन युद्धाला प्रोत्साहन दिल्याबद्दल अमेरिकेने भारतावर कर लादला आहे. तसेच अमेरिकन सरकार सध्या पाकिस्तानशी जवळीक वाढवण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत भारत देखील आपल्या सर्व पर्यायांवर विचार करत आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या रशिया भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील लष्करी तंत्रज्ञान सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा झाली. भारतातील रशियन दूतावासाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली होती. तसेच, नागरी विमान निर्मिती, धातू उद्योग आणि रासायनिक उद्योग यासारख्या इतर धोरणात्मक क्षेत्रांमध्ये संयुक्त प्रकल्प राबविण्यावर चर्चा झाली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech