भगव्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला – साध्वी प्रज्ञा

0

मुंबई : ज्यांनी भगव्यावर अत्याचार केला त्यांना देव शिक्षा देईल. मी आता प्रसन्न आहे. मी आपले आभार मानते, धन्यवाद देते. निर्दोष सुटूनही सामाजिक जीवनात जे नुकसान झालेलं आहे त्याच काय करायचं. असे असले तरी भगव्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा सिंह यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण देशाच लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला आहे. तब्बल १७ वर्षानंतर एनआयए कोर्टाने हा निकाल दिला आहे. मालेगावच्या भिक्कू चौकात २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणात ६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, १०० पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. आज न्यायाधीश ए.के. लाहोटी यांच्या कोर्टाने निकाल दिला. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुख्य आरोपी होत्या. आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने निकाल देताना १७ वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

साध्वी प्रज्ञा पुढे म्हणाल्या की, मला जेव्हा तपासयंत्रणांनी बोलावलं तेव्हा मी सहकार्याच्या भावनेने आले होते. पण मला पोलीस कोठडीत ठेवलं, अपमान केला मारहाण केली. कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञांना रडू कोसळलं. पुढे त्या म्हणाल्या, माझा समाजात अपमान झाला. पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले पण मला लोक वाईट नजरेने बघायचे, अपमानित करायचे… माझ्यावरून भगव्या रंगाला कलंकित केलं गेलं. १७ वर्षात मी पहिल्यांदा आनंदी झाले आहे. अपमानच आयुष्य मी १७ वर्षे जगत होते. भगव्याला आतंकवाद बोललं, आज भगव्याचा विजय झाला हिंदुत्वाचा विजय झाला. राकेश धावडे यांच्या मुलाला शाळेत प्रवेश दिला जात नव्हता. राकेश धावडे यांच्या पत्नीने नाव बदललं तेव्हा त्यांचा मुलाचा शाळेत प्रवेश झाला‘ असं त्या म्हणाल्या.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप करण्यात आला होता. या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली दुचाकी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर होती. या दुचाकीद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणला होता असा आरोप त्यांच्यावर होता. जामिनावर बाहेर असताना त्यांना भाजपाकडून खासदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech