छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्काराचे अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरण

0

* स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने स्वीकारला पुरस्कार

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण “वर्षा” या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित “अनादि मी.. अनंत मी…” या गीताकरिता राज्य शासनाच्या “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार – २०२५” सोहळ्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार संजय उपाध्ये, सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे रणजित सावरकर, श्रीमती अशीलता राजे, स्वप्निल सावरकर, मंजिरी मराठे, अविनाश धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी २ लाख रुपयांचा धनादेश स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे जगण्याची आणि मरण्याची दोन्हीची प्रेरणा देते. त्यासोबतच, प्रचंड बुद्धिमत्तेने संभाजी महाराजांनी स्वतः साहित्य निर्मितीचे कार्यही फार उत्तम केले. त्यांनी ग्रंथही लिहिले, कविताही लिहिल्या. म्हणूनच, त्यांच्या नावाने राज्याचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वाभाविकच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अनादि मी, अनंत मी..’ प्रचंड आत्मबळ असलेले गीत त्यांनी लिहिले आणि रचले. त्यामुळेच राज्य शासनाने हा पुरस्कार दिला असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech