महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सक्त तंबी
मुंबई : अनंत नलावडे
राज्यात झालेली अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची आवश्यकता भासणार असून, वाळू घाटांचे लिलाव वेळेत करण्याचे सक्त आदेशच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच या कामात दिरंगाई करण्यावर कडक कारवाईचा सक्त इशाराही त्यांनी दिला. वाळू धोरण आणि वाळू गटाबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक आढावा बैठक पार पडली.बैठकीला अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. तर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना
बावनकुळे म्हणाले,“राज्यात कोणत्याही परिस्थितीत वाळू टंचाई निर्माण होऊ नये.वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.तसेच वाळूचा अवैध उपसा व वाहतूक थांबवण्यासाठी कठोर कारवाईही करावी.वाळू माफियांवर कारवाई होईलच पण, वाळू चोरी झाल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, अशी सक्त तंबीही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळालेल्या वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आले असून पर्यावरण परवानगी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी महसूल आणि पर्यावरण विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही बैठकीत संबंधितांना दिल्या गेल्या.राज्यातील वाळू साठ्यांची तपासणी करून माहिती अद्ययावत करण्याचेही निर्देशही देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या…….
बैठकी दरम्यान पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवावी असे निर्देश सर्वच विभागीय आयुक्तांना दिले. इतकेच नव्हे तरं शेतकऱ्यांच्या मदती संदर्भातील माहिती दररोज शासनाला सादर करावी, अशाही परखड सूचना करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
कुणबी प्रमाणपत्र देताना दक्ष रहा…..
मराठा समाजाला कुणबी आरक्षण देत असताना कुणबी जात प्रमाणपत्र देताना कोणतीही चूक होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी, सर्व कागदपत्रांची काटेकोर तपासणी करावी,आणि चुकीची जात प्रमाणपत्रे देण्यात येऊ नयेत, असेही बैठकीत ठामपणे स्पष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्रांवर कारवाई होणार
माजी खासदार किरीट सोमय्या या बैठकीला उपस्थित होते.त्यांनी यावेळी अपात्र व्यक्तींना बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले.त्यांची माहिती शासनाकडे पोहोचवून, अवैध प्रमाणपत्रे रद्द करावीत आणि संबंधितांची नावे आधार संकेतस्थळावरून वगळावीत, अशी त्यांनी मागणी केली. यावर दिवाळीनंतर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.