दिव्यांगांची खिल्ली उडवल्याबद्दल समय रैनासह पाच जणांना सुप्रिम कोर्टाकडून माफी मागण्याचे आदेश

0

नवी दिल्ली : दिव्यांग आणि गंभीर शारीरिक समस्यांशी झुंजणाऱ्या व्यक्तींचा उपहास करणाऱ्या व्हिडिओंच्या प्रकरणात कॉमेडियन समय रैनासह पाच जणांनी सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. कोर्टाने या व्यक्तींना त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आणि इतर प्लॅटफॉर्मवर देखील माफी मागण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोर्टाने हेही स्पष्टपणे सांगितले आहे की, भविष्यात अशा प्रकारचे विनोद टाळावे आणि आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून इतरांनाही जागरूक करावे की त्यांनी असे कधीही करू नये.

अहवालानुसार, या याचिकेत समय रैना, विपुन गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत जगदीश तनवार यांची नावे आहेत. यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये आणि पॉडकास्ट्समध्ये अशा प्रकारच्या टिप्पणी केल्या, ज्या दिव्यांग व्यक्तींच्या स्वाभिमान आणि प्रतिष्ठेला ठेस पोहोचवतात.या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर होत आहे. ही याचिका रणवीर अल्लाहबादिया आणि आशीष चंचलानी यांच्या प्रकरणांशी जोडण्यात आली आहे, जे ‘इंडियास गॉट लेटेंट ’ या वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित आहेत. दोघांनीही त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआर एकत्रित करण्याची विनंती केली आहे.

कोर्टाने केंद्र सरकारला पक्षकार म्हणून समाविष्ट करण्याची परवानगी दिली आहे आणि अटर्नी जनरल यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी अशा मार्गदर्शक तत्त्वांची (गाइडलाइन्स) निर्मिती करावी, जी सर्वांच्या अधिकारांचे रक्षण करतील आणि कोणाच्याही गरिमा, सन्मान किंवा आत्मसन्मानाला धक्का पोहोचणार नाही. गाइडलाइन्स तयार करताना एसएमए फाउंडेशन ऑफ इंडिया या याचिकाकर्त्या संस्थेची सक्रिय सल्लामसलत घेतली जाईल. कोर्टाने हेही स्पष्ट केले की, इतर हितधारकांचे मत आणि सूचना देखील घेतल्या जाव्यात. या गाइडलाइन्स फक्त एखाद्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून नसाव्यात, तर भविष्यातील गरजा लक्षात घेऊन व्यापक आणि दूरदृष्टीने तयार करण्यात याव्यात, असेही कोर्टाने नमूद केले आहे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech