मणिपूरमध्ये सुरक्षा दलांची कारवाई; २०३ शस्त्रास्त्र आणि स्फोटके जप्त

0

इंम्फाल : मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहिम राबवून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि स्फोटके जप्त केली आहेत. ही कारवाई ३ जुलैच्या रात्रीपासून ४ जुलैच्या सकाळपर्यंत तेंगनौपाल, कांगपोकपी, चंदेल आणि चुराचांदपूर जिल्ह्यांतील डोंगराळ व दुर्गम भागांमध्ये पार पडली. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या अचूक गुप्त माहितीनंतर मणिपूर पोलिस, आसाम रायफल्स/सेना आणि केंद्रीय निमलष्करी दलांच्या संयुक्त पथकांनी ही धडक मोहिम राबवली होती. या कारवाईत एकूण २०३ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

यामध्ये २१ इन्सास रायफल, ११ एके-सीरिज, २६ एसएलआर, दोन स्नायपर रायफल, दोन एमए असॉल्ट रायफल, तीन कार्बाइन, १७ नग ३०३ रायफल, दोन मोर्टार(५१मिमी), तीन एम ७९ ग्रेनेड लाँचर, ३८ ‘पॉम्पी’ देशी बनावटीची शस्त्रे, तसेच पिस्तुल व बोल्ट-ॲक्शन रायफल्स यांचा समावेश आहे. याशिवाय, ३० आयईडी, १० हँड ग्रेनेड, ९ पॉम्पी शेल, २ लाथोड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणावर ५.५६ मिमी व ७.६२ मिमी जिवंत काडतुसे सुद्धा सापडली आहेत.  अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शस्त्रे उग्रवादी किंवा समाजकंटकांनी भविष्यातील हिंसाचारासाठी साठवून ठेवली होती. ही मोठी कामगिरी मणिपूरमधील उग्रवादाच्या पायाभूत रचनेला कमजोर करणारी ठरली असून, राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, पुढील काही दिवसांत आणखी मोहिमा राबवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech