गंगटोक : सिक्कीममधील पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावापर्यंत पोहचण्यासाठी भारतीय लष्कराने अत्यंत खराब हवामान आणि खडतर भूभागातून पायीच वाट काढत लाचेन गाव गाठले आणि तिथे अडकलेल्या ११३ पर्यटकांना शोधून काढले. त्यातील ३३ जणांना विमानाने बाहेर काढण्यात आले असून यामध्ये काही परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने बुधवारी(दि. ४) दिली.
याबाबत संरक्षण मंत्रालयाने आज(दि.४) माहिती दिली की, उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या विनाशकारी भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य धोकादायक भूभागात नागरिकांचा शोध आणि बचाव कार्य करत आहे. पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावात पायीच लष्कर पोहोचले आहे, तिथे ११३ अडकलेले पर्यटक सापडले. त्यापैकी ३० जणांना काल विमानाने बाहेर काढले आहे. भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार एमआय-१७ हेलिकॉप्टरने मदत आणि आपत्ती निवारण मोहिमा सुरू केली आहे. मदत साहित्य टाकण्यात आले आहे. या परिसरात एनडीआरएफ पथके दाखल झाली आहेत. दुर्गम चाटेन प्रदेशातून दोन अमेरिकन नागरिकांसह ३३ अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले.
सिक्कीममध्ये झालेल्या मोठ्या भूस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या लेफ्टनंट कर्नलसह ६ जणांचा अद्याप पत्ता लागलेला नाही, असे लष्कराने बुधवारी सांगितले. रविवारी रात्री उत्तर सिक्कीममधील चाटेन येथील लष्करी छावणीच्या ठिकाणी भूस्खलन झाले. ६ जणांना शोधण्यासाठी तातडीने शोध मोहीम सुरू आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये लेफ्टनंट कर्नल प्रितपाल सिंग संधू, सुभेदार धर्मवीर, नाईक सुनीलाल मुचाहरी, शिपाई सैनुधीन पीके, स्क्वाड्रन लीडर आरती संधू (निवृत्त), लेफ्टनंट कर्नल संधू यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी मिस अमायरा संधू यांचा समावेश आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
रविवारी(दि. १) संध्याकाळी ७ वाजता सिक्कीममधील लाचेन जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या भूस्खलनात भारतीय लष्कराच्या एका छावणीलाही फटका बसला. लष्कराने तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या भूस्खलनात १३ सैनिक आणि अनेक नागरिक अडकले. लष्कराच्या बचाव पथकाने ७ जणांना वाचवले, तर ६ जण बेपत्ता असून अद्याप शोध सुरु आहे.