मुंबई : धुळे येथील शासकीय विश्रामगृहातील घटना गंभीर आहे. तेथे सापडलेल्या रोकड प्रकरणाची सत्यता अजून समजलेली नाही. मात्र, त्याची सत्यता बाहेर आली पाहिजे. कारण विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभे राहणे हे कदापि सहन करू शकत नाही. विधानमंडळाची आपली एक प्रतिमा आहे. त्यामुळे या प्रकरणात दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे असे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी धुळ्याच्या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळाची अंदाज समिती काल, बुधवारी धुळ्याच्या दौऱ्यावर होती. या दौऱ्याच्या दरम्यान खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या खोलीत कोट्यवधीची रक्कम आढळून आली. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली.
या प्रकरणात कोण दोषी आहे, कोणी पैसे मागितले का याचा छडा लावण्यात येईल. याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती यांना देखील विनंती करून त्यांनी स्वतंत्रपणे एथिक्स समिती नेमून चौकशी करावी. विधानमंडळ समितीची बदनामी होणे परवडणारे नाही. त्यामुळे या प्रकरणात गांभीर्यांने कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी मी स्वत: पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. वैष्णवी हगवणेचे बाळ आता तिच्या वडिलांकडे पोहोचलेले आहे. वैष्णवीचे प्रकरण हे अतिशय दुर्देवी असून ते मानवतेला काळिमा फासणारे आहे . त्यामुळे या प्रकरणाची योग्यरितीने चौकशी करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. वैष्णवीच्या अंगावर ज्या प्रकारे मारहाणीचे वळ होते, तिच्या ऑडिओ क्लिप्स तसेच वैष्णवीच्या घरच्यांनी दिलेली माहिती या आधारावर ही चौकशी होईल,असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित
दरम्यान, धुळे विश्रामगृहातील धक्कादायक घटनेची विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात अंदाज समिती दौऱ्यावर असताना विधिमंडळचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे.
जिल्हा धुळे येथे विधीमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर असताना विधिमंडळाचे संशयित कक्षअधिकारी श्री किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले असून , संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती गठित करण्यात येत आहे.
– प्रा राम शिंदे, सभापती , महाराष्ट्र विधानपरिषद.