नाशिक : आज कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने न्यु एज अभ्यासक्रमांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून यंदा सहा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारी यंत्रे आणि शिक्षक देण्य़ात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. शुक्रवार दि. ३० मे रोजी दुपारी ३ वाजता निमा हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होते. यावेळी धुळा लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव, आ. सीमा हिरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, सतीश सुर्यवंशी, अनिल गावित आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना लोढा म्हणाले की, या अभ्यासक्रमांचे कसे आधुनिकीकरण करता येईल, यासाठी आपण निधी उपलब्ध करुन दिला आहे. विविध उद्योग, संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कौशल्य विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअनुषंगानेच निमासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून नाशिककरांना अधिकाधिक संधी कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत असल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले. त्याचबरोबर रोजगार वाढविण्यासाठी सहा अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सुधारणा करण्य़ासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचप्रमाणे खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना देखील सोबत घेण्यात येणार असून १० वर्षासाठी ५ कोटी कर २० वर्षासाठी १० कोटी निधी दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.