पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदावरून खासदार सुप्रिया सुळे यांना हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले आहे. राज्यातील बृहन्मुंबईतील तसेच बृहन्मुंबई व्यतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांसाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे.
बारामतीतील या संस्थेच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना झाली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या अध्यक्षपदी होत्या. आता त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या सदस्यपदी ज्योती नवनाथ बल्लाळ, डॉ. कीर्ती सतीश पवार, डॉ. सचिन कोकणे, श्रीनिवास वायकर, डॉ. दिलीप लोंढे, अविनाश गोपने, बिरजू मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.