नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा अद्याप सुरू आहे आणि त्यात खंड पडलेला नाही. मात्र काही सीमा आहेत ज्या ओलांडल्या जाऊ शकत नाहीत. भारताचे स्वतःचे राष्ट्रीय हित आहेत आणि त्यानुसारच निर्णय घेतले जातात. मोदी सरकारची हीच स्पष्ट धोरणे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी नमूद केले की शेतकऱ्यांचे हित, धोरणात्मक स्वायत्तता आणि पाकिस्तान प्रश्नावर कोणत्याही प्रकारची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही. ह्या ‘रेड लाईन’ ओलांडल्या जाऊ शकत नाहीत.
एका वृत्तपत्राशी संबंधित कार्यक्रमात बोलताना डॉ. जयशंकर म्हणाले की, तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने व्यापारासह इतर मुद्दे हाताळले. गैर-व्यापारिक मुद्यांवर टॅरिफ लावणे हे पूर्णतः नवे व असामान्य होते. ट्रम्प यांची ही शैली इतर देशांबरोबरच त्यांच्या स्वतःच्या देशासाठीही नवी होती. रशियाकडून भारताकडील तेल खरेदीमुळे अमेरिकेकडून टॅरिफ निर्बंध घालण्याचा विषय हा केवळ दिखावा असल्याचे जयशंकर म्हणाले. रशियाकडून सर्वाधिक तेल आयात चीन करतो आणि युरोप ऊर्जा क्षेत्रात सर्वाधिक आयात करतो, असे त्यांनी निदर्शनास आणले.
भारताच्या भूमिकेविषयी ते म्हणाले की, अमेरिकेसोबत व्यापार चर्चा सुरूच आहे आणि ती बंद झाल्याचे कोणत्याही बाजूने जाहीर झालेले नाही. मात्र भारत आपले शेतकरी व लघुउद्योजक यांच्या हितावर तडजोड करणार नाही. भारत धोरणात्मक स्वायत्तता राखतो आणि आपले निर्णय स्वतंत्रपणे घेतो. पाकिस्तान प्रश्नावर संपूर्ण देशाची एकमताची भूमिका आहे आणि त्यावरील कोणतीही मध्यस्थी भारत कधीही स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.