भारतीय लष्कराकडून ‘अनंत शस्त्र’ खरेदीसाठी निविदा

0

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर हवाई संरक्षण अधिक सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत लष्कराने डीआरडीओने विकसित केलेल्या ‘अनंत शस्त्र’ या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी निविदा काढली आहे. पाच ते सहा रेजिमेंट्सच्या या प्रणालीची खरेदी करण्यात येणार असून, अंदाजे ३०,००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स क्षमतांना मोठी बळकटी देणार आहे.

या प्रकल्पासाठी भारत सरकारच्या मालकीच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ला निविदा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रणालीने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानी ड्रोन हल्ले थोपविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मे महिन्यात पार पडलेल्या या कारवाईनंतर संरक्षण अधिग्रहण परिषदेने ‘अनंत शस्त्र’ प्रणाली खरेदीस हिरवा कंदील दिला. त्यानंतर ही निविदा प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली असून, स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘अनंत शस्त्र’ प्रणालीची रचना अत्यंत गतिशील आणि लवचिक आहे. चालत्या स्थितीतही ही प्रणाली लक्ष्य शोधू व त्याचा मागोवा घेऊ शकते. अगदी अल्पकाळासाठी वाहन थांबवून देखील शत्रूवर क्षेपणास्त्र मारा करण्याची क्षमता तयात आहे. दिवस असो वा रात्र, कोणत्याही परिस्थितीत प्रभावी ठरणाऱ्या या प्रणालीची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. सुमारे ३० किमीच्या पल्ल्याची क्षमता असलेली ही प्रणाली भारतीय लष्कराच्या विद्यमान MRSAM आणि ‘आकाश’ क्षेपणास्त्र प्रणालीला पूरक ठरणार आहे. विशेष म्हणजे, ही प्रणाली पश्चिम आणि उत्तरेकडील दोन्ही सीमेवर तैनात करण्यात येणार असून, चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांकडून निर्माण होणाऱ्या धोक्याला तोंड देण्यासाठी ती एक महत्त्वाची कवच ठरणार आहे.

पाकिस्तानसोबत झालेल्या अलीकडील संघर्षात भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स युनिट्सने L-70 आणि Zu-23 एअर डिफेन्स गनच्या साहाय्याने बहुतेक ड्रोन निष्प्रभ केले होते. तसेच आकाश, MR-SAM, भारतीय हवाई दलाच्या स्पायडर प्रणाली आणि सुदर्शन S-400 नेही निर्णायक भूमिका बजावली होती. आता ‘अनंत शस्त्र’ प्रणालीच्या समावेशामुळे भारतीय लष्कराचा हवाई संरक्षणाचा किल्ला अधिकच भक्कम होणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ लष्कराची प्रत्यक्ष लढाईतील क्षमता वाढणार नाही, तर संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेलाही मोठा हातभार लागणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही अत्याधुनिक प्रणाली शत्रूला कोणत्याही वेळी, कोणत्याही सीमेवर प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech