‘बेस्ट’ कामगार पतपेढी निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत

0

मुंबई : हिंदी सक्तीच्या विरोधात अनेक वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे दिसून आले होते. मात्र ही युती पुढील काळात कायम राहणार की नाही, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा होता. त्या दरम्यान मुंबई महापालिका संलग्न बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवारी, १८ ऑगस्टला जाहीर झाली आहे. या सोसायटी निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता असते, त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पॅनल एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बेस्ट पतपेढीमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. मागील नऊ वर्षाच्या कालावधीत बेस्ट कामगार सेनेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामगार कल्याणकारी कामामुळे कामगारांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यामुळे आणखी ताकद वाढणार आहे. याचा पतपेढीच्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणार यात शंका नाही, असा विश्वास बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले.

मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आगामी काळात महापालिकेत सत्तास्थापना करू शकतात, असा दोन्ही पक्षांच्या समर्थकांचा कयास आहे. बेस्टचे बहुतांश कामगार, युनियनचे पदाधिकारी बेस्टच्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. तर कित्येक पदाधिकारी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत. बेस्ट पतपेढीची निवडणूक ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची नांदी मानली जात आहे. त्यामुळे बेस्टमधील ठाकरे बंधूच्या युतीला फार महत्व प्राप्त झाले आहे.

बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यात या युतीबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार, दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आता बेस्टमधील प्रत्येक लढाई बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्रित लढणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारच्या काळात ग्रॅच्युईटीसाठी मुंबई महापलिका प्रशासन नियमित मदत करत होते. पण जून २०२२ नंतर महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर बेस्टमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी वाढत चालली आहे. बेस्टचा स्व-मालकीचा बसताफा कमी होत चालला आहे. नवीन नोकर भरती नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे, अशी भूमिका दोन्ही पक्षांकडून मांडण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech