मुंबई : अनंत नलावडे
“आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महा विकास आघाडीत राज ठाकरे यांच्या “मनसे” च्या समावेशाबाबतचा निर्णय हे इंडिया आघाडीतील नेतेच घेतील”, अशी स्पष्टोक्ती करत,मनसेच्या माविआ तील सामील होण्याच्या चर्चा फक्तं समाज माध्यमात सुरू असल्याचा पुनरुच्चारही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की,भाजपच्या हुकूमशाही कारभारा विरोधात तसेच लोकशाही व संविधानाच्या संवर्धन व संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष लढा देत असून या लढाईत देशभरातील अनेक पक्ष सहभागी होत इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे.राज्यातही भाजपा विरोधात महाविकास आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात झाल्या पाहिजेत पण मागील काही निवडणुकांमध्ये घोटाळे करण्यात आले. त्यात प्रामुख्याने मतदार याद्यांमध्ये गडबड करण्यात आली. मतचोरीचा प्रकार आधीच राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केला आहे.हाच मुद्दा घेऊन आज मविआ, व विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी ज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांचे नेते यांनी राज्यात विविध पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा.वर्षाताई गायकवाड उपस्थित होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडीचा करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.आघाडी वा युतीचा निर्णय राज्य स्तरावर घेतला जाणार नाही, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.