उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

0

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंत आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या राजपत्राद्वारे धनखड यांच्या राजीनाम्याची अधिसूचना दिली होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ अंतर्गत, भारतीय निवडणूक आयोगाला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. ही निवडणूक “राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२” आणि “राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम, १९७४” अंतर्गत घेतली जाते.

निवडणूक आयोगाने नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्राथमिक तयारी पूर्ण होताच निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. आतापर्यंत झालेल्या सर्व उपराष्ट्रपती निवडणुकीची पार्श्वभूमी माहिती संकलित आणि प्रसिद्ध केली जाते. उपराष्ट्रपती पदासाठी निष्पक्ष, मुक्त आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलली जात असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी उपराष्ट्रपती पदाचा जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भारताचे चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की ते आरोग्याला प्राधान्य देऊन तात्काळ पद सोडत आहेत. भाजपने १६ जुलै २०२२ रोजी धनखड यांना उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित केले. तर ६ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech