सरकारने पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी – लष्करप्रमुख

0

चेन्नई : ‘जर तुम्ही कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला विचारलं की, युद्ध कुणी जिंकलं? तर, ते नक्की हेच म्हणतील की, आम्हीच जिंकलो, म्हणूनच आमचा प्रमुख फील्ड मार्शल झाला’, असे विधान करत सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी (दि.९) ऑपरेशन सिंदूरबाबत प्रथमच मद्रासमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाष्य केले. या दरम्यान त्यांनी अनेक गोष्टींबाबत स्पष्टपणे सांगितले. यासोबतच ते म्हणाले की, “केंद्र सरकारने सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. यामुळेच आपण पाकिस्तानला धडा शिकवण्यात यशस्वी झालो आहोत.”

जनरल द्विवेदी यांनी शनिवारी(दि.९) मद्रासमध्ये आयोजित एका सभेला संबोधित करताना म्हणाले की,एक नरेटीव्ह मॅनेजमेंटद्वारे पाकिस्तानी सैन्याने जनतेला विश्वासात घेतले आहे. तेथील संघर्षाबद्दल सोशल मीडियावर एक खोटी कथा तयार केली गेली. यामुळेच पाकिस्तानच्या लोकांना अजूनही वाटते की, ते जिंकले आहेत. सेना प्रमुख म्हणाले, “नॅरेटिव्ह मॅनेजमेंट सिस्टिम ही अशी गोष्ट आहे, ज्याची आपल्याला मोठ्या प्रमाणावर जाणीव होते, कारण विजय हा मनात असतो. तो नेहमीच मनातच राहतो. जर तुम्ही एखाद्या पाकिस्तानीला विचारले की तुम्ही हरलात की जिंकलात, तर तो म्हणेल की आमचे प्रमुख फील्ड मार्शल बनले आहेत, म्हणजे आम्हीच जिंकलो असू, म्हणूनच ते फील्ड मार्शल बनले.”

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या रणनीतीला आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा वापर करून जनतेपर्यंत आपला संदेशही पोहोचवला. त्यांनी सांगितले की रणनीतिक संदेश देणे खूप आवश्यक होते, आणि म्हणूनच आम्ही जो पहिला संदेश दिला तो होता – ‘न्याय झाला’. मला सांगण्यात आले आहे की आज जगभरातून आपल्याला जेवढे हिट्स मिळाले, त्यामध्ये सर्वाधिक हिट्स ह्याच संदेशामुळे मिळाले.

सेना प्रमुखांनी भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सकडे लक्ष वेधले आणि सांगितले की हा रणनीतिक संदेश साधा होता, पण तो जगभर पसरला. सेना प्रमुख म्हणाले, “तुम्ही जगभर ज्या गोष्टी पाहत आहात, त्या एका लेफ्टनंट कर्नल आणि एका एनसीओने तयार केल्या होत्या. हे सर्व आम्ही तयार केलं होतं. जेव्हा आम्ही अशा प्रकारच्या ऑपरेशन्समध्ये सहभागी होतो, तेव्हा आम्ही या गोष्टींकडे (रणनीतिक संदेश) देखील लक्ष द्यायचो, कारण नॅरेटिव्ह मॅनेजमेंट सिस्टिम ही खूप महत्त्वाची असते. यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागते.”

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते. सर्वांना पाकिस्तानकडून बदला घ्यायचा होता. हल्ल्याच्या २४ तासांच्या आत संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत थेट आणि स्पष्ट आदेश देण्यात आले. आता काहीतरी मोठे करायचे आहे. आता हे पुरे झाले. आम्हाला, लष्कर प्रमुखांना, पाकिस्तानकडून बदला घेण्याची संपूर्ण रणनीती बनवण्याचे काम देण्यात आले होते. या विश्वासामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आहे, असे जनरल द्विवेदी म्हणाले.ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला झालेल्या नुकसानाबद्दल पहिल्यांदाच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विधान केले. याआधी हवाई दल प्रमुखांनी काल सांगितले होते की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान आम्ही पाकिस्तानचे ५ लढाऊ विमान पाडले आहेत. ३०० किलोमीटर आत घुसून आम्ही त्यांना धडा शिकवला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech