संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शेलार यांच्या हस्ते भारतीय प्रजातीच्या दुर्मीळ वृक्षांची लागवड

0

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आज ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या संजय गांधीराष्ट्रीय उद्यानामध्ये भारतीय प्रजातीच्या दुर्मीळ वृक्षांची लागवड करण्यात आली. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. भारत हा विविधतेचा देश म्हणून ओळखला जातो. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या वैविध्यपूर्ण भारतात वैविध्यतेची संकल्पना जैव विविधतेतून आली आहे. मूळ भारतीय प्रजातीचे प्रत्येक झाड कुठल्या न कुठल्या जैविक घटकाला अन्न, निवारा व आपली पुढची पिढी वाढविण्यासाठी हक्काचीठिकाणे देतात. म्हणून या वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले. आज लावलेल्या वृक्षांपैकी काही झाडे कीटक व फुलपाखरांना आधार देतात. काही झाडे पक्ष्यांना, तर काही झाडे छोट्याप्राण्यांना आधार देतात. अशा प्रकारे जीवनसाखळीचे चक्र पूर्ण होते.

भारताच्या विविधतेने आपले शीर्षस्थ नेतृत्त्व म्हणून स्वीकारलेल्या नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी दुर्मीळ अशी सह्याद्रीच्या स्थानिक प्रजातींची ७५ झाडे लावणे व जैवविविधता सांभाळणे, अशी या वृक्षलागवडीमागची संकल्पना आहे. ही रोपे झाडे होतील व त्या झाडांचे वृक्ष होतील. वन्यजीवांच्या अनेक पिढ्या या वृक्षांचे लाभार्थी असतील. मोदीजींनी घडविलेला नवा भारतही त्यांच्या पुढच्या पिढ्यांसह अशाच प्रकारे वर्षानुवर्षे त्यांच्या कार्याचा लाभ घेत राहील, अशा भावना यावेळी पालकमंत्री शेलार यांनी व्यक्त केल्या.

या उपक्रमांतर्गत ७५ दुर्मिळ वृक्षांची लागवड केली त्यामध्ये कारपा, हुम्ब, वटसोल, सफेद धूप, चांदकुडा, उपास, तांबडा कुडा, आंबेरी, तिरफळ, मिरची कंद, फणशी, कडवा शिरीड, गोरखचिंच, कुमकुम, चारोळी, नांद्रूक, खडक पायर, दातीर, नागकेशर, सप्तरंगी, रानजांभूळ, समुद्रशिंगी, शेरस, रानबिबा, काळा धूप, वारंग अशा अनेक दुर्मीळ व स्थानिक प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech