नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी आयसीसी दहशतवादी संघटनेचे २ दहशतवादी अटक करून, दिल्लीतील बाजारपेठांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याच्या त्यांच्या कटाला उधळून लावले आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आहे. चौकशीतून उघड झाले की, ते आयसिसच्या निर्देशानुसार दिल्लीमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेनंतर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार, पोलिसांच्या स्पेशल सेलने आयसीसच्या टेरर मॉड्यूलशी संबंधित २ संशयितांना अटक केली आहे. यापैकी एकाचे नाव अदनान आहे. या दहशतवाद्यांपैकी एक दिल्लीचा रहिवासी असून दुसरा मध्य प्रदेशचा आहे. या दोघांकडून संशयास्पद साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. या मॉड्यूलशी संबंधित एका दहशतवाद्याला भोपाल येथून अटक करण्यात आली असून, दुसऱ्याला दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्लीतील जास्त गर्दी असलेले भाग हे या दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. सुरुवातीच्या तपासात असे समोर आले आहे की, अटक केलेले दोन्ही दहशतवादी आत्मघाती हल्ल्यासाठी प्रशिक्षण घेतलेले होते. पोलिसांनी सांगितले की, हे दोघे आपला कट राबविण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. या दोघांकडून गोळाबारूद देखील जप्त करण्यात आले आहे.