तेलंगणामध्ये दोन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

0

हैदराबाद : प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-माओवादी) या संघटनेचे २ नक्षलवाद्यांनी आज, गुरुवारी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये काकरला सुनीता उर्फ बद्री, या दंडकारण्य विशेष झोनल समितीची (डीके एसझेडसी) वरिष्ठ राज्य समिती सदस्य असून चेनुरी हरीश उर्फ रामन्ना हा तेलंगणा राज्य समितीचे क्षेत्रीय समिती सदस्य (एरिया कमिटी मेंबर – एसीएम) यांचा समावेश असल्याचे राचाकोंडाचे पोलिस आयुक्त जी. सुधीर बाबू यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ नक्षलवादी चळवळीत सक्रिय होती. त्या सीपीआय (माओवादी) च्या प्रादेशिक राजकीय शाळा आणि शिक्षण विभाग समितीची ती सदस्य होती. पक्षाची धोरणे तयार करणे, दस्तऐवज तयार करणे आणि क्रांतीसारख्या पक्षाच्या पत्रिकांचे प्रकाशन यामध्ये तिचा मोलाचा वाटा होता. सुनीताचा माओवादी विचारसरणीशी संबंध १९८५ मध्ये इंटरमिजिएट शिक्षण घेत असताना राजमुंद्री येथे आला. त्या काळात त्या रेडिकल स्टुडंट्स युनियन (आरएसयू) पासून प्रभावित झाली होती. सुनीताचे वडील काकरला सत्यनारायण देखील नक्षल विचारांनी प्रभावित विरसम नामक लेखक संघटनेत होते.

तिच्या घरी वरवरा राव आणि इतर नक्षलवादी म्होरक्यांची उठबस होती. त्याने प्रभावित होऊन सुनीताने जानेवारी १९८६ मध्ये सीपीआय (एमएल) पीपल्स वॉर मध्ये सहभागी होऊन अंडरग्राउंड जीवन सुरू केले. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये तिने टीएलएन चलं उर्फ गौतम उर्फ सुधाकर यांच्याशी विवाह केला. त्याचप्रमाणे १९९० च्या दशकात सुनीता हिने नल्लमल्ला जंगलातील फॉरेस्ट डिव्हिजनल कमिटीमध्ये काम केले आणि अनेक चकमकींमध्ये भाग घेतला. नंतर ती आंध्र-ओडिशा सीमावर्ती भागात सक्रिय झाली आणि २००६ मध्ये तिला दंडकारण्यात पाठवण्यात आले. पोलिसांनी सांगितले की ५ जून २०२५ रोजी अन्नापुरम नॅशनल पार्क येथे झालेल्या चकमकीतही ती सहभागी होती. याच चकमकीत तिच्या पतीचा मृत्यू झाला होता.

सुनीता सोबतच हरिश नामक नक्षलवाद्याने देखील आत्मसमर्पण केलेय. हरिश भूपालपल्ली जिल्ह्यातील सहिवासी आहे. तो २००६ मध्ये इयत्ता दहावीत असताना बीसी वेल्फेअर वसतिगृहात वास्तव्याला होता. यावेळी तो नक्षलवादी विचारांनी प्रभावित झाला. . दोघांचे आत्मसमर्पण ही तेलंगणा पोलिसांच्या धोरणाचे मोठे यश असल्याचे जी. सुधीरबाबू यांनी सांगितले. तसेच त्यांनीसर्व अंडरग्राउंड माओवाद्यांना आवाहन केले की, त्यांनी मुख्य प्रवाहात परत यावे आणि राज्याच्या विकासामध्ये सहभाग घ्यावा. त्यांनी हेही आश्वासन दिले की, मुख्य प्रवाहात परतणाऱ्या सर्व माओवाद्यांना तेलंगणा सरकारच्या पुनर्वसन योजनेंतर्गत सर्व लाभ दिले जातील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech