विधेयकाचे नाव ‘जन सुरक्षा’ ऐवजी ‘भाजप सुरक्षा’ करायला हवे – उद्धव ठाकरे

0

मुंबई : पूर्वी जसा मिसा कायदा, टाडा कायदा होता, तसाच आता हा जनसुरक्षा कायदा आणण्यात आला आहे. याचे नाव ‘जन सुरक्षा’ ऐवजी ‘भाजप सुरक्षा’ करायला हवे,” अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. ते विधान भवनात पत्रकारांसोबत बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले, विधानमंडळात जन सुरक्षा कायदा, या नावाने एक कायदा आणला जात आहे. काल खालच्या सभागृहात तो बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. सत्ताधारी पक्षाकडे पाशवी बहुमत आहे आणि ते त्याचा उपयोग अथवा दुरुपयोग करत आहेत. याला आमचा विरोध का आहे? ते आमच्या सदस्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक दिसत आहे. ते सांगताना सांगत आहेत की, नक्षलवाद आणि दहशतवादाचा बिमोड करायचा आहे. मात्र, या विधेयकात कुठेही नक्षलवाद अथवा दहशतवाद असा उल्लेख नाही.

सुरुवातीला केवळ कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांना असे लिहिले आहे. खरे तर, आता डावे आणि उजवे यातील फरक कळण्याची आवश्यकता आहे. साधारणपणे त्यावेळी शिवसेना आणि भाजप आम्ही सोबत होतो. आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत, कारण आम्ही धर्म मानणारे आहोत. आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही याला जरूर समर्थन दिले असते अथवा देऊ, पण तुम्ही त्यातील जे शब्द आहेत, त्यात सुधारणा करा. त्यात स्पष्ट शब्दात देश विघातक कृती करणारे, देशद्रोही, नक्षलवादी, यांचा उल्लेख करा आणि पुन्हा विधेयक आणा. पण जर असे मोघम विधेयक आणले की, ज्याला काही शेंडा बुडखा नाही की, धर आणि उठसुट टाक आत. एवढेच नाही तर, ज्या पद्धतीने टाडाचा दुरुपयोग केला गेला की, आमच्या पाक्षात ये नाही, तर तुला टाडाखाली टाकतो. तसाच याचा दुरुपयोग होईल.

मला असे वाटते की, याचे नाव ‘जन सुरक्षे’ ऐवजी ‘भाजप सुरक्षा’ करायला हवे. कारण भाजप विरोधात जो बोलेल, तो जणू काही देशद्रोही आहे, असा काही त्याचा समज आहे. जर देश विघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर, आम्हाला विचारण्याची गरज नाही. आम्ही नक्कीच सरकारसोबत आहोत, राहू आणि राहणार. मात्र तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे विधेयक आणत असाल आणि तसा त्याला वास येतोय. कारण मी म्हटले तसे, यात कुठेही नक्षलवाद, वगैरे वगैरे असा काही शब्दच नाही. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधेयकातील एक परिच्छेदही वाचून दाखवला आणि यात कुठेही दहशतवाद आणि नक्षलवाद हे शब्द नाही, असे म्हणत, हे सर्वसामान्य जनतेला कधीही, कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात, असा दावाही ठाकरेंनी केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech