मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे – उद्धव ठाकरे

0

मुंबई : मराठी भाषेवरून राजकारण तापले असताना आता शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि खासदार निशिकांत दुबे यांना उद्देशून घणाघात केला आहे. “मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,” असं सांगतानाच ठाकरे यांनी भाजपच्या ‘तोडा आणि राज्य करा’ या नीतीवरही खरमरीत टीका केली. आज विधानभवनात माध्यमांसमोर ते बोलत होते.

फडणवीस आणि शेलार यांना ठाकरेंचे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमाला ‘रुदाली’ अशी हिणकस उपमा दिली होती. यावरही उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांची मानसिकता समजण्यासारखी आहे. कारण आता मुळ भाजप मेला आहे. त्याचा खून याच लोकांनी केला आहे. त्यामुळे सध्या त्याच भाजपासाठी रुदाली सुरू आहे आणि त्यासाठी भाड्याचे उर बडवे घेतले आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

मनसे कार्यकर्त्यांनी मराठी येत नसल्यामुळे एका उत्तर भारतीय व्यापाऱ्याला फटकावल्याच्या घटनेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत ती पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना करताना म्हटलं होतं की, “ते धर्म विचारून गोळ्या घालतात, इथे भाषा विचारून मारहाण होते.” या विधानाचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेत शेलार यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “जे लोक मराठीसाठी आंदोलन करत आहेत, त्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली जाते, हे खरोखरच लाजिरवाणं आहे. अशा तुलना करणारे खरे मराठीचे मारेकरी आहेत. पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले का?”

“दुबे कोण? हा कोण लकडबग्गा?” – ठाकरेंचा निशिकांत दुबे यांच्यावर हल्लाबोल
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत, “उर्दू, तमिळ, तेलुगू लोकांनाही मारा,” अशी भाषा वापरली होती. तसेच “तुम्ही आमच्या पैशांवर जगता,” असेही वक्तव्य त्यांनी केलं. यावर उद्धव ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया देत दुबेंना ‘लकडबग्गा’, ‘तरस’ अशा उपमा दिल्या. “दुबे कोण? त्यांना कोण ओळखतं? हा कोण लकडबग्गा? लकडबग्गा म्हणजे जो ना धड लांडगा असतो ना धड कुत्रा. त्यांना तशीही लायकी नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांना चांगलंच सुनावलं. “मराठीचा इंगा अजून ताठ आहे. गरज पडल्यास दाखवणारच,” असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपच्या राजकारणावर घणाघात : ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर भाजपच्या बुडाला आग लागली आहे, असं सांगतानाच उद्धव म्हणाले, “भाजपचं राजकारण फोडा आणि राज्य करा हे आहे. लोकांच्या घरांना आग लावून आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हा त्यांचा धंदा होता. पण आता तो संपला आहे.” मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही : उद्धव ठाकरेंनी या सगळ्या वादातून स्पष्ट संदेश दिला. “मराठीचा अपमान करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं जाईलच. मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अस्मिता ही आमची ओळख आहे. ती कोणीही पायदळी तुडवू शकत नाही.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech