निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या – उद्धव ठाकरे

0

मुंबई : निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट टीका केली आहे. या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही वेडं वाकडं वागलो असू तर गोष्ट वेगळी, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल, तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाहीत. मतांची टक्केवारी वगैरे जे काही असेल ते चिन्हापुरतं, हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. पण त्या धोंड्यानं हे केलं ना. त्या धोंड्यानं ते बेकायदेशीर केलंय, असेही ठाकरे म्हणाले. ‘सामना’ वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ठाकरे बोलत होते. या मुलाखतीमध्ये त्यांनी राज्यातील विविध विषयांवर आणि राजकीय परिस्थितीवर परखडपणे मत व्यक्त केले. या मुलाखतीत बोलताना ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालावरुन जोरदार हल्लाबोल केला.

‘शिवसेना’ हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं!
शिवसेना एकच, आपली आहे तीच शिवसेना. अमित शहा व निवडणूक आयोगाने जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली. मी याआधी बोललो आहे की, निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना’ हे नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. त्यांना तो अधिकारच नाही. कारण हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का?” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ‘शिवसेना’ हे नाव त्याला दुसऱ्याला देता येत नाही. ते त्याच्या अधिकाराच्या बाहेरचं आहे, पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसल्याने सध्या चालून जातंय. एक धोंड्या गेला आणि दुसरा खुर्चीवर बसलाय, पण तो निर्णय बदलायला तयार नाही. पण लोक कोणत्याही धोंड्याचं ऐकणार नाहीत. शेवटी चोरीचा माल आहे. चोरून मतं मिळवलीत आणि त्यावर मर्दुमकी गाजवत असलात तरी चोर तो चोरच.

राजकारणी आमदारांना फोडून सत्तेच्या शीत कपाटात ठेवतात!
ठाकरे पुढे म्हणाले, देशात आणि राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाने सध्या कळस गाठला आहे. जंगली प्राणी हिंस्त्र नाही. हिंस्त्र राजकारणी असतात. जंगलात कोणी कुणावर विनाकारण हल्ला करत नाही. भूक लागल्याशिवाय ते हल्ला करत नाही. वाघ भूकेपूरतीच शिकार करतो. उगाच प्राणी मारत फ्रिजमध्ये ठेवत नाही. सत्ता मिळाली तर आमदार घ्या आणि खासदार घ्या असं करत नाही. कारण त्यांच्याकडे फ्रिज नाही. एक हरण मारलं म्हणून उद्यासाठी दुसरं हरण मारू असं प्राणी करत नाहीत. हे राजकारणी आमदारांना फोडतात आणि सत्तेच्या शीत कपाटात थंड करून ठेवतात.

आमच्याकडून जे गेले, ते काय दिवे लावतात ते तुम्ही पाहताय!
काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडा अवधी द्यावा लागतो. नवीन झरा यावा लागतो. एखाद्यावेळी भावनेच्या भरात आणि प्रेमामुळे आपण करत नाही. कारण माणूस अयोग्य आहे. स्वत:हून जातो आणि त्याची जागा दुसरा घेतो. त्यामुळे वाईट वाटतं. अरे हा गेला. आमच्याकडून जे गेले, ते काय दिवे लावतात ते तुम्ही पाहता. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना. जिकडे गेले तिकडे काय प्रकाश पाडतात कळतात, असे तोंडसूख त्यांनी घेतले.

जनता आणि कार्यकर्त्यांच्या पिढ्यान पिढ्या शिवसेनेसोबत!
सर्व सामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता जो माझ्याकडे काही मागण्यासाठी आला नाही. त्यांच्या पिढ्यान पिढ्या शिवसेनेसोबत आहे. कोण गेलं. ज्यांना काही ओळख नव्हती, त्यांना मोठं केलं. पण ज्यांनी मोठं केलं ती लोकं आजही माझ्यासोबत आहे. ही शक्ती आहे. तीच त्यांची पोटदुखी आहे. अरे हे अजून संपत कसे नाही.

…म्हणून शिवसेना संपवू शकत नाही!
शिवसेना जमिनीचा मित्र आहे. म्हणून शिवसेना संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि मूळं खाली गेली आहेत. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात. म्हणून जमीन तुम्ही तुमच्या शत्रूला दिली. मुंबईसह सर्व जमीन तुमच्या मित्राच्या घशात घातली, अशी चपराक त्यांनी अदानींचे नाव न घेता सरकारला दिली. तुम्ही शत्रू आहात. आम्ही जमिनीशी मैत्री करणारे आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे ब्रँड हा आम्ही नाही, लोकांनी बनवलेला!
तुम्ही जो ठाकरी वाऱ्यांचा विषय काढला, तर हे ठाकरी वारे नाहीत. आमची पाळेमुळे ही गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आहेत. अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून ते शिवसेना प्रमुख (बाळासाहेब ठाकरे) आणि त्यानंतर मी (उद्धव ठाकरे), आदित्य ठाकरे आणि आता राजही (राज ठाकरे) सोबत आलेला आहे. सदा सदासर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष. हा संघर्ष एका मतलबी वाऱ्यासाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी आम्ही हा संघर्ष करत आलेलो आहोत. आम्ही सत्तेत किती काळ राहिलो? यापेक्षा आम्ही संघर्ष करत आलेलो आहोत. त्यामुळेच हा जो काही ठाकरे ब्रँड हा आम्ही बनवलेला नाही, लोकांनी बनवलेला आहे. कारण लोकांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणारे आहेत. त्यामुळे आज एवढे वर्ष महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर राहिली आहेत”, असंही ते म्हणाले.

जगात व्यवसायात किंवा उत्पादनात अनेक मोठमोठे ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संघर्ष करतात. मात्र, तरीही ठाकरे ब्रँड हा देशाच्या राजकारणात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला असं संजय राऊतांनी विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “ठाकरे फक्त ब्रँड नाही, तर मराठी माणसांची आणि महाराष्ट्रात हिंदू अस्तिमेतची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोणी प्रयत्न करेन, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले. पण ठाकरे ब्रँड संपला नाही. आज माझ्याकडे काही नाही. तरीही मी कुठेही गेलो तरी अतिशय प्रेमाणे स्वागत करतात, बोलतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech