उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना “हिंदीची सक्ती हवीच कशाला?” पुस्तक दिले भेट

0

– विधानसभा विरोधी पक्षनेते पद, त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवर झाली चर्चा

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांना “हिंदीची सक्ती हवीच कशाला?” हे राज्यभरातील विविध संपादकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलित पुस्तक भेट दिले. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार वरुण सरदेसाई, आमदार सचिन आहिर, आमदार सुनील राऊत आणि मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल उद्धव ठाकरे यांना मिश्कीलपणे “सत्ताधारी पक्षात येण्याचे” आमंत्रण दिले होते. त्यानंतर आज ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेतल. ही भेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात झाली.

या भेटीत विधानसभा विरोधी पक्षनेते पद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्ती संदर्भात ठाकरे व फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. हिंदीची सक्ती हवीच कशाला? हे पुस्तक ठाकरे यांनी फडणवीसांना दिले. तसेच, हेच पुस्तक नव्याने नेमण्यात आलेल्या समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना आपण द्यावे, असं फडणवीस यांनी ठाकरेंना म्हटले. तर, विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. मात्र, हे विरोधी पक्षनेतेपद अजूनही दिलं जात नाही, त्या संदर्भाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत अँटी चेंबरमध्ये चर्चा केल्याची माहिती आहे.

दरम्यान, अंबादास दानवे यांची आमदारकी ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येत आहे. मात्र, पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुढील अधिवेशनासाठी कोणीही विरोधी पक्षनेते राहणार नाही. त्यामुळे, अगोदरच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्याची मागणी केली आहे.आता, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ येत्या काही दिवसांत संपणार आहे. त्यांचे या टर्ममधील हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे काल, बुधवारी त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री, तसेच विरोधी पक्षांतील उद्धव ठाकरे आणि इतरांनी भाषणे केली. मुख्यमंत्र्यांनी हे विधान करताच समोरच्या बाकावरून उद्धव ठाकरे यांनी काहीतरी टिप्पणी केली. यावर फडणवीस म्हणाले की, “उद्धवजी २०२९ पर्यंत तरी आम्ही त्याबाजूला येण्याचा काहीच स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. त्यावर विचार करता येईल. त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech