आता महाराष्ट्रही काबीज करू – उद्धव ठाकरे

0

मुंबई : मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली आणि करणारच. मराठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी उभं राहणारच. हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही. पालख्यांचे भोई होणार की माय मराठीला पालखीमध्ये बसवणार?, असा सवाल करत महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. काही म्हणतात यांचा म मराठीचा नाही. म महापालिकेचा आहे. अरे आता म महाराष्ट्रही काबीज करू, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तुटू नका, फुटू नका.. मराठी ठसा पुसू नका… असं आवाहन करत ठाकरेंनी भाषणाचा शेवट केला.

हिंदी सक्तीचे दोन अध्यादेश रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्या वतीने मुंबईत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ठाकरे बोलत होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही व्यासपीठावर उपस्थित होते. याशिवाय शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील आदी नेतेही सहभागी झाले होते. ठाकरे पुढे म्हणाले, तुम्ही गद्दारी केली आणि आमचं सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे बसलेत. त्यांचे बुट चाटण्यासाठी तुम्ही हे करत आहात. आपल्या डोळ्यांदेखत लचके तोडले जात आहे. किती काळ सहन करायचं? प्रत्येकवेळी काय झालं की भांडाभांडी करणार. आम्ही एकत्र आल्यावर सत्ताप्राप्ती करणार.

राज आणि मी अनुभव घेतला आहे, या नतद्रष्टांचा. वापरायचं आणि फेकायचं. आजपर्यंत वापर करून घेतला. आता आम्ही दोघं वापर करून फेकणार आहोत. अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला ओळखतं कोण होतं महाराष्ट्रात? कोणत्या भाषेत बोलत होता? राज तू सर्वांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मोदींची शाळा कोणती? सर्वच उच्चशिक्षित आहे. भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. मधल्या काळात सुरू केलं की, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे कडवट हिंदुत्ववादी आहोत. तुम्ही काय हिंदुत्व शिकवता, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही. पण मारूती स्तोत्र का विसरायला लावता. जय श्रीरामला विरोध नाही. पण भेटल्यावर राम राम म्हणणारे आम्हीच मराठी. तुम्ही आता जय श्रीराम म्हणता. पण जय जय रघुवीर समर्थ म्हणणारे आमचे रामदास होते. आमच्या दोघांमधील अंतरपाट होता, तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी. आज मला कल्पना आहे. अनेक बुवा, महाराज बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय. कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील, त्या सर्वांना सांगतोय.. या भोंदूपणा विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे ठाकलो आहोत, असंही ठाकरे म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech