मुंबई : हा अत्यंत धक्कादायक निकाल आहे असे ज्येष्ठ विधिज्ञ आणि भाजपा खासदार उज्ज्वल निकम यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ११ जुलै २००६ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या १२ आरोपींपैकी ११ जणांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ज्येष्ठ विधीज्ञ आणि राज्यसभा खासदार निकम म्हणाले की, २००६ मध्ये ज्या पद्धतीने आरडीएक्सचा वापर करून रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्यात आले, ते १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांप्रमाणेच होते. २०० हून अधिक निरपराध प्रवासी या स्फोटांत बळी पडले होते. अशा गंभीर प्रकरणात दोषी ठरवलेल्यांना १९ वर्षांनंतर निर्दोष ठरवण्यात येणे हे दु:खद आहे.” निकम यांनी स्पष्ट केले की, “मी हा खटला चालवलेला नाही, पण एक नागरिक म्हणून हा निकाल पाहून दु:ख वाटते. सत्र न्यायालयाने ज्या पुराव्यांवर आधारित शिक्षेचे निर्णय दिले, तेच पुरावे उच्च न्यायालयाने अपुरे ठरवले. हे निश्चितच चिंतेचे आहे.
” निकम पुढे म्हणाले, “सरकारने या निर्णयाचे सखोल मूल्यांकन करून सर्वोच्च न्यायालयात तातडीने अपील करणे गरजेचे आहे. काही खटल्यांमध्ये अपील वर्षानुवर्षे प्रलंबित राहते आणि निर्णय फिरतो, तेव्हा तो धक्का मोठा असतो. त्यामुळे या प्रकरणात त्वरित कारवाई झाली पाहिजे.” उच्च न्यायालयानेही आपल्या निकालात तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे नमूद केले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची फेरचाचणी आवश्यक असल्याचेही संकेत आहेत. यासंदर्भात सूचना करताना निकम म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात तातडीने अपील दाखल करणे आवश्यक आहे. सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयातील निर्णयांमधील तफावत तपासणे गरजेच असून अशा गंभीर प्रकरणांमध्ये अपील प्रक्रिया विलंबित होता कामा नये असेही त्यांनी सांगितले.