दिल्ली बॉम्बस्फोट : डॉ. उमरने घाईगडबडीत केला बॉम्बस्फोट

0

फरीदाबादच्या छापेमारीमुळे घाबरला होता दहशतवादी

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटाच्या तपासात नवे धागेदोरे समोर आले आहेत. या स्फोटात वापरण्यात आलेली हुंडई आय-२० कार फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी थेट जोडलेली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या कारचा चालक डॉ. उमर मोहम्मद नबी हा पुलवामाचा रहिवासी असून, तोच या घटनेतील संशयित आहे. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, फरीदाबादमधील दहशतवादी मॉड्यूलवर छापा टाकल्यानंतर उमर मोहम्मद अत्यंत घाबरला होता. आपल्या इतर सहकाऱ्यांच्या अटकेनंतर पकडले जाण्याच्या भीतीने त्याने घाईगडबडीत हा आत्मघाती स्फोट घडवून आणल्याची शक्यता तपासात वर्तवली जात आहे. कारमध्ये इम्प्रोसिव्ह एक्स्प्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) बसवण्यात आले होते. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जखमी झाले आहेत. अनेक वाहने आणि जवळील मालमत्ता जळून खाक झाली.

फरीदाबादमध्ये काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. त्यात अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरचा समावेश होता. त्याच मॉड्यूलशी डॉ. उमर मोहम्मदचा संबंध असल्याचे समोर आले आहे. तपासात असेही उघड झाले की, उमर हा जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित होता. त्याचा सहकारी आणि कारचा मालक तारिक याला अटक करण्यात आली आहे. त्यानेच उमरला स्फोटासाठी ही आय-२० कार दिली होती. स्फोटानंतर घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए नमुना दिल्ली पोलिसांकडून तपासला जाणार आहे, ज्यातून हे निश्चित केले जाईल की तो मृतदेह डॉ. उमर मोहम्मदचाच आहे की नाही. कार चालवणाऱ्या व्यक्तीचे काही सीसीटीव्ही फुटेजेस देखील समोर आले असून, त्यात मुखवटा घातलेला व्यक्ती कार चालवत असल्याचे दिसते.

स्फोटानंतर दिल्लीतील सर्व सीमांवर पोलिसांनी तपासणी नाके उभारले असून, प्रत्येक वाहनाची काटेकोर तपासणी सुरू आहे. लाल किल्ला परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी स्वतंत्र टीम्स कार्यरत आहेत. तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, स्फोटापूर्वी ती कार जवळपास ३ तास पार्किंगमध्ये उभी होती. प्राथमिक तपासात हे स्पष्ट होते की दिल्लीतील स्फोट आणि फरीदाबाद मॉड्यूल हे एकमेकांशी जोडलेले आहेत. स्फोटात वापरण्यात आलेली सामग्री अमोनियम नायट्रेट आणि इंधन तेलाचे मिश्रण असावे असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech