वसंतदादांचे सरकार आम्ही घालवले!, शरद पवारांची कबुली

0

पुणे : दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (वसंतदादा) हे आम्हा लोकांचे नेते, पण ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्हा तरुणांचा काँग्रेसला विरोध होता. त्यामुळेच आम्ही वसंतदादांचे सरकार घालवले, अशी जाहीर कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः दिली. ज्या वसंतदादांचे सरकार मी पाडले, नंतर त्यांनीच भूतकाळ विसरून, गांधी-नेहरुंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला असंही ते म्हणाले. त्यावेळचे राजकारण कसे होते आणि आताचे राजकारण कसे बदलत गेलंय, याचा संदर्भ या निमित्ताने पवारांनी दिला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले की, काँग्रेसमध्ये आम्ही होतो तेव्हा काँग्रेस वेगळी झाली. निवडणूक झाली, कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यावेळेस काँग्रेसमध्ये एक राग असायचा. तेव्हा आम्ही ठरवलं. दादांचे सरकार घालवायचं आणि मी मुख्यमंत्री झालो. त्या १० वर्षांनंतर आम्ही परत एकत्र आलो. पण मुख्यमंत्री कोणाला बनवायचं? याची चर्चा झाली. वसंतदादांनी सांगितलं की, आता चर्चा नाही. पक्ष सर्वांचा आहे, म्हणून याचं नेतृत्व शरदकडे द्यायचं, असं वसंतदादा त्या काळात म्हणाले होते. आज देशातलं चित्र बदललं आहे. आम्ही पार्लमेंटमध्ये आहोत, पार्लमेंटचं १४ दिवसांचं अधिवेशन चालू आहे. १४ दिवसांमध्ये सातत्याने पार्लमेंटचं कामकाज ठप्प होतंय. आम्ही जातो, सही करतो आणि आत गेल्यानंतर दंगा सुरू होतो आणि सभागृह तहकूब होतं आणि मग दुसऱ्या दिवशी जावं लागतं. अशी स्थिती देशात यापूर्वी कधीही नव्हती.

राज्यकर्त्यांकडूनच संसदेचं कामकाज बंद पाडलं जाणं हे चित्र संसदीय लोकशाहीला न शोभणारं आहे आणि तेच चित्र बदलायचा आहे. म्हणून आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये एकत्र बसलो. त्यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे असतील, त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील, त्यामध्ये अन्य पक्षांचे नेते असतील, मी असेन आणि आम्ही ठरवलं रोज रोज सभागृह बंद पाडणं, महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं आणि सत्तेचा गैरवापर करणं ही जर भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असेल तर त्यासाठी आपण एकत्रित भूमिका घेतली पाहिजे. म्हणून पार्लमेंटच्या इतिहासामध्ये कधी झालं नाही असे ३०० खासदार बाहेर आले आणि त्यांनी संयमानं, शांततेने आंदोलन केले. आम्ही लोकांना अटक केली गेली आणि आम्हा ३०० खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे सर्व कशासाठी तर लोकशाही टिकवायची आहे, संसदीय पद्धती टिकवायची आहे आणि त्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे.

काल मी प्रधानमंत्री यांचं भाषण ऐकले. देशासाठी लाल किल्ल्यावरून एक दृष्टी देण्याचं काम सर्व प्रधानमंत्री करत असतात. आनंद आहे ते त्यांनी केले, पण प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून करत असणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जवाहरलाल नेहरूंचे नाव घेत नाहीत. मी अस्वस्थ होतो. आयुष्यातला उमेदीचा काळ ज्यांनी स्वातंत्र्यासाठी दिला, कशाचाही विचार केला नाही, घरादाराचा विचार केला नाही, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश एकसंध ठेवण्यासाठी त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. जगात भारताची महती वाढवण्याचं काम केले. सध्याचे दिवस सोपे नाहीत. पण चिंता करण्याचं कारण नाही. आपण विचारधारा मान्य असलेल्या सगळ्यांना संघटित करू आणि पुन्हा एकदा गांधी नेहरूंच्या विचारांची मांडणी करून देशाचा चेहरा बदलेल कसा याची काळजी घेऊ, असेही पवार म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech