नोटांच्या सुटकेससह शिरसाटांचा व्हिडीओ व्हायरल

0

उबाठा गटाच्या संजय राऊतांचे गंभीर आरोप

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना (शिंदे-गट) नेते संजय शिरसाट नोटांनी भरलेल्या सुटकेससह हॉटेलमध्ये बसल्याचा व्हिडीओ उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला. तसेच हा व्हिडीओ पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना टॅग करत राऊतांनी आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी ट्विटरवर (एक्स) व्हिडीओ शेअर केला आहे. यासह त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत देशात काय चालले आहे असा प्रश्न विचारला आहे.

या व्हिडीओमध्ये मंत्री संजय शिरसाट एका खोलीमधील बेडवर बसून फोनवर बोलत आहेत व सिगारेट ओढत आहेत. व्हिडीओमध्ये बेड शेजारी एक बॅग देखील दिसत आहे. या बॅगेत नोटांची बंडलं आहेत. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट यांचा पाळीव श्वान देखील दिसत आहे.शिरसाट यांच्या बाजूला पैशांनी भरलेल्या बॅगा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आयकर विभागाच्या नोटिशीनंतर शिरसाटांचा हा व्हिडीओ आपल्याकडे आल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरसाटांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचा हा व्हिडीओ खूप काही सांगून जातो. हा व्हिडीओ पाहून मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दया येते. स्वतःच्या अब्रूचे किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत ? असे औपरोधिक प्रश्न देखील राऊतांनी विचारला आहे.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी कथित पैशाच्या बॅगेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या घरातील हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला यावर त्यांनी टिप्पणी केली आहे. सदर व्हिडिओ माझ्या बेडरूममधीलच आहे. मी प्रवास करून आल्यानंतर बेडवर बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय. बेडशेजारी आमचा श्वानही आहे. प्रवासातून आल्यानंतर माझी कपड्यांची अडकवलेली बॅग दिसतेय, त्याची बातमी होते, याचं मला आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माझ्याकडे मातोश्री व मातोश्री-२ नाही. माझे घर माझ्या मतदारसंघातील प्रत्येकासाठी उघडे असते. कार्यकर्ते येतात, उत्साहाच्या भरात कोणीतरी व्हिडिओ काढला असेल. माझ्या घरात चिठ्ठी देऊन कोणालाही बोलावले जात नाही. काम काय, नाव काय, अशा गोष्टी विचारल्या जात नाहीत असा खुलासा शिरसाट यांनी केलाय.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech