विजय शहांचा माफीनामा फेटाळला, अटकेला स्थगिती

0

– कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधानाचे प्रकरण
– सर्वोच्च न्यायालयाने दिले एसआयटी चौकशीचे आदेश

नवी दिल्ली : कर्नल सोफिया कुरेशींच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणारे मध्यप्रदेशचे मंत्री विजय शहांची माफी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. परंतु, त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत. विजय शाह यांच्या वकिलाने सांगितले की त्यांच्या अशिलाने माफी मागितली आहे. याबद्दल न्यायालयाने त्यांना खडसावले. तुम्ही लोकांसमोर पूर्णपणे उघडे पडला आहात. तुम्ही एक सार्वजनिक व्यक्ती आहात. बोलताना तुम्ही तुमच्या शब्दांचा विचार केला पाहिजे अशा शब्दात कोर्याने खडसावले तसेच याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले. या एसआयटी पथकात ३ आयपीएस अधिकारी असतील, ज्यात एक आयजी आणि उर्वरित २ एसपी दर्जाचे अधिकारी असतील. या अधिकाऱ्यांपैकी एक महिला असणे अनिवार्य असेल. सर्व अधिकारी मध्य प्रदेश केडरचे असू शकतात, परंतु ते राज्यातील मूळ रहिवासी नसावेत. एसआयटी २८ मे पर्यंत स्थिती अहवाल सादर करेल.मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने गेल्या १४ मे रोजी शाह यांच्या विधानाची दखल घेतली आणि एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांच्याविरुद्ध इंदोरच्या महू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. याविरुद्ध शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

इंदोरच्या महू येथील रायकुंडा गावात ११ मे रोजी झालेल्या हलमा कार्यक्रमात मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल म्हटले होते की, ‘त्यांनी आमच्या हिंदूंचे कपडे काढून त्यांची हत्या केली आणि मोदीजींनी त्यांच्या बहिणीला त्यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी पाठवले.’ शाह पुढे म्हणाले, ‘आता मोदीजी कपडे तर काढू शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी त्यांच्या समुदायाच्या बहिणीला पाठवले की जर तुम्ही आमच्या बहिणींना विधवा केले असेल तर तुमच्या समुदायाची बहीण येऊन तुम्हाला नग्न करून सोडून जाईल. तुमच्या जातीच्या आणि समुदायाच्या बहिणींना पाकिस्तानात पाठवून आपण देशाच्या सन्मानाचा आणि आपल्या बहिणींच्या कुंकवाचा बदला घेऊ शकतो असे शाह म्हणाले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech