मुंबई : ‘१२वी फेल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपली खास ओळख निर्माण करणारा अभिनेता विक्रांत मेस्सी लवकरच एका वेगळ्या चित्रपटात झळकणार आहे. विक्रांत सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘व्हाइट’ ची तयारी करत आहे. जो आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर आधारित आहे. अलीकडेच विक्रांत मेस्सी आणि श्री श्री रविशंकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे त्याच्या या बायोपिकशी संबंधित असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चित्रपटाबाबत अधिकृत माहिती समोर आली असून, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रांत लवकरच ‘व्हाइट’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असून, यातील सुमारे ९० टक्के चित्रीकरण दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया येथे होणार आहे. हे केवळ बायोपिक नसून, कोलंबियामध्ये गेल्या ५२ वर्षांपासून सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षामध्ये श्री श्री रविशंकर यांनी केलेल्या शांतीदूताच्या भूमिकेचं चित्रण देखील यात करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक आणि भावनिक घटनांची खरी खोली प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी यासाठी निर्मात्यांनी कोलंबियामध्येच चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रांत मेस्सी सध्या ‘व्हाइट’ या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे गुंतलेला आहे. नुकतीच त्याची भेट बेंगळुरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमाला झाली होती, जिथे त्याने श्री श्री रविशंकर यांनी सुरु केलेल्या हॅप्पीनेस प्रोग्रॅममध्ये भाग घेतला. त्यादरम्यान त्याने ध्यान, प्राणायाम, योगासने आणि गुरूजींची जीवनशैली समजून घेण्याचा प्रयत्न केला.
विक्रांतने आपला लुकही बदलण्यास सुरुवात केली असून, त्याने दाढी आणि केस वाढवले आहेत. त्याचबरोबर श्री श्री रविशंकर यांचे बोलणे, हसणे, चालणे हे बारकाईने आत्मसात करत आहे. तो दररोज त्यांच्या प्रवचनांचे व्हिडिओ पाहून आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘व्हाइट’ हा चित्रपट केवळ एका आध्यात्मिक गुरूची कहाणी न राहता, एका जागतिक पातळीवर शांतीसाठी झालेल्या प्रयत्नांची प्रेरणादायक गाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. विक्रांत मेस्सी लवकरच कोलंबियाला रवाना होणार असून चित्रपटाच्या शूटिंगला अधिकृत सुरुवात होणार आहे.