लेह : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी लेहमध्ये बुधवार (२४ सप्टेंबर) पासून सुरू झालेला आंदोलन हिंसक वळणावर गेला असून, त्यात जाळपोळ व रस्त्यांवर झटापट झाली. या दरम्यान ४ जणांचा मृत्यू झाला असून किमान ८० लोक जखमी झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या अनेक महिन्यांपासून लडाखसाठी विविध प्रकारे आंदोलने करत होते. आता विद्यार्थी त्यांच्या पाठिंब्यात रस्त्यावर उतरले आहेत.यावेळी प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांची पोलिसांसोबत झटापट झाली, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. माहितीनुसार, या झटापटीत ४० पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस व निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून, त्यांनी अश्रुधुराचे गोळेही फोडले.
लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी लेहमध्ये उसळलेल्या हिंसेची तीव्र निंदा केली आहे. त्यांनी इशारा दिला की, केंद्रशासित प्रदेशात शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. उपराज्यपाल म्हणाले, “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. उपोषण देखील लोकशाही परंपरेचा भाग आहे. पण गेल्या एक-दोन दिवसांत जे पाहायला मिळाले, ते म्हणजे लोकांना चिथावणी दिली जात आहे, नेपाळ आणि बांगलादेशशी तुलना केली जात आहे, खासगी कार्यालये आणि घरे पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, दगडफेक केली जात आहे, हे लडाखच्या परंपरेत बसणारे नाही.”
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा. सहाव्या अनुसूचीत लडाखचा समावेश करून घटनात्मक सुरक्षा मिळावी. कारगिल आणि लेहसाठी स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ असावी. सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे. या प्रदर्शनकर्त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. प्रदर्शनकर्त्यांच्या या मागण्यांबाबत केंद्र सरकार ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये बैठक घेऊ शकते.साल २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० आणि ३५ए रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीर व लडाख यांना वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले होते. त्यावेळी केंद्र सरकारने परिस्थिती सामान्य झाल्यावर पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते.