पुणे : येत्या जानेवारी महिन्यात साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. आज रविवारी पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्य महामंडळाची ही बैठक पार पडली. या बैठकीला महामंडळाच्या चारही घटक संस्थांचे तसेच संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत अध्यक्षपदासाठी विविध संस्थांनी विविध नावे सुचवली होती. या सुचवलेल्या नावांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर बहुतांश सदस्यांनी विश्वास पाटील यांच्या नावावर सहमती दर्शवली. त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. विश्वास पाटील हे मराठीतील नामवंत आणि लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर प्रभावी लेखन केलं आहे. ‘पानिपत’, ’झाडाझडती’, ’सिंहासन’, ’चंद्रमुखी’ अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या आहेत. संशोधन, प्रभावी भाषा, नाट्यमयता आणि मानवी भावभावनांचे जिवंत दर्शन ही त्यांच्या लेखनाची ठळक वैशिष्ट्य दिसून येतात.