युद्ध हे नेहमीच अनपेक्षित असतं – लष्करप्रमुख जनरल द्विवेदी

0

नवी दिल्ली : जेव्हा रशिया युद्धात उतरला, तेव्हा आम्ही नेहमीच असा विचार केला होता की हे युद्ध केवळ १० दिवस चालेल. ईराण-इराक युद्ध जवळपास १० वर्षं चाललं. पण जेव्हा ऑपरेशन सिंदूरबाबत गोष्ट आली, तेव्हा आम्हाला कल्पनाही नव्हती की हे किती दिवस चालेल, आणि आपल्यापैकी अनेक लोक म्हणत होते की हे चार दिवसांच्या टेस्ट मॅचसारखं का संपलं? युद्ध हे नेहमीच अनपेक्षित असतं. एखाद्या मुद्द्याचा मानसिक प्रभाव किती असेल, याचा आपण अंदाज लावू शकत नाही,” असे विधान करत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी(दि.९) युद्धांच्या अनपेक्षित स्वरूपावर चर्चा केली आणि आधुनिक युद्ध व लष्करी तयारीचे काही महत्त्वाचे पैलू स्पष्ट केले.

जनरल द्विवेदी यांनी युद्ध व लष्करी तयारीच्या तीन प्रमुख पैलूंवर – बल दृश्यीकरण, बल सुरक्षा आणि बल प्रयोग – सविस्तर चर्चा केली. त्यांनी सांगितले, “आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा या तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो – बल दृश्यीकरण, बल सुरक्षा , आणि बल प्रयोग. आपण पाहतो की रशिया-युक्रेन युद्धात जे बल दृश्यीकरण करण्यात आलं, ते कदाचित चुकीचं गणित होतं. या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट अशीही आहे की, युद्ध दीर्घकाळ चालू ठेवण्यासाठी दुसऱ्या बाजूला जी तंत्रज्ञानाची क्षमता आहे, ती आपल्याला समजून घ्यावी लागेल. याचा अर्थ असा की, आपल्याकडे दीर्घकालीन युद्धासाठी आवश्यक तेवढे संसाधन नक्कीच असले पाहिजे.”

थलसेना प्रमुखांनी आधुनिक युद्धातील ‘डेव्हिड आणि गोलायथ’ तत्त्व यावरही भर दिला — जिथे कमी खर्चात आणि उच्च तंत्रज्ञानासह एक देश, तांत्रिकदृष्ट्या प्रबळ असलेल्या प्रतिस्पर्ध्यालाही मागे टाकू शकतो. ते म्हणाले, “जर तुमच्याकडे कमी खर्चाची पण उच्च दर्जाची तंत्रज्ञान क्षमता असेल, तर तुम्ही तुमच्याहून प्रबळ प्रतिस्पर्ध्यालाही पराभूत करू शकता. सुरक्षा ही एक नवी संकल्पना आहे, कारण तुम्हाला शत्रूच्या हल्ल्याचा सामना करण्यास सक्षम असले पाहिजे आणि त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासही सज्ज असले पाहिजे. त्यामुळे मी या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. ह्याच मुख्य बाबी आहेत, ज्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे.”

जनरल द्विवेदी पुढे म्हणाले, “लक्ष्य सतत बदलत राहणार आहेत. जर मी आज म्हणालो की एखादी गोष्ट मला १०० किलोमीटरवरून फायर करायची आहे, तर उद्या तीच गोष्ट ३०० किलोमीटरवर न्यायची गरज भासेल. कारण केवळ मीच नाही, तर माझा शत्रूही आपली तंत्रज्ञान क्षमता वाढवत आहे. जसं त्याचं तंत्रज्ञान प्रगती करतंय, तसं मला हे नक्की करावं लागेल की माझं तंत्रज्ञान त्याच्या तुलनेत अधिक प्रगत असेल. याठिकाणी आत्मनिर्भरता अत्यंत महत्त्वाची ठरते.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech