सीमापार शस्त्रास्त्रांच्या तस्करीविरुद्ध झीरो टॉलरन्स धोरण पाहिजे – पर्वतननेनी हरीश

0

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतननेनी हरीश यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (यूएनएससी) आवाहन केले आहे की, शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात मदत करणाऱ्यांविरुद्ध “शून्य सहनशीलतेची” धोरणे स्वीकारली जावीत. त्यांचे हे विधान दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी आणि राजदूत पर्वतननेनी हरीश म्हणाले, भारताला सीमापार दहशतवादाचा सामना करावा लागत आहे, ज्यामध्ये सीमापलीकडून तस्करी केलेल्या अवैध शस्त्रांचा वापर करून भारताला लक्ष्य केले जाते. पुढे हरीश म्हणाले, “संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं अशा शस्त्रांच्या वापरात आणि त्यांच्या पुरवठ्यात मदत करणाऱ्या लोकांविरुद्ध कोणतीही सहनशीलता न दाखविण्याचे धोरण अवलंबले पाहिजे.”

हरीश यांनी ‘यूएन सिक्युरिटी कौन्सिल स्मॉल आर्म्स ओपन डिबेट’ दरम्यान सांगितले की, “भारत अनेक दशकांपासून दहशतवादाविरुद्ध लढत आहे. त्यामुळे छोट्या शस्त्रास्त्रांची आणि दारूगोळ्यांची बेकायदेशीर वाहतूक आणि ती दहशतवादी संघटनांच्या हाती पडल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी आम्ही पूर्णपणे सजग आहोत.” पर्वतननेनी हरीश यांनी ही वक्तव्ये नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर काही तासांतच संयुक्त राष्ट्र मुख्यालयात केली. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झाला. ट्रॅफिक सिग्नलवर मंद गतीने चालणाऱ्या कारमध्ये अचानक स्फोट झाला.पर्वतननेनी हरीश यांनी पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख करत म्हटले,“भारताला सीमापार दहशतवादामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे, ज्यामध्ये आमच्या सीमांपलीकडून तस्करी केलेल्या ड्रोन आणि अवैध शस्त्रांचा वापर केला जातो.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech