भारत सरकार, इतिहास अभ्यासकांचे मनःपूर्वक आभार
मुंबई : महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेची साक्ष देणारे राज्यातील ११ आणि तामिळनाडूतील ‘जिंजी’ किल्ला अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची बातमी प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयात अभिमानाचं स्फुल्लिंग पेटवणारी आहे. हा केवळ ऐतिहासिक सन्मान नाही, तर हे आपल्या स्वराज्याच्या साक्षीदार गडकिल्ल्यांचे जागतिक महत्त्व अधोरेखित करणारे गौरवचिन्ह आहे. आता छत्रपतींचा इतिहास केवळ आपल्या पाठ्यपुस्तकांपुरता न राहता, जागतिक अभ्यासाचा विषय होणार आहे. पण या गौरवाच्या पार्श्वभूमीवर एक जबाबदारीही आपल्या सर्वांवर येते ती म्हणजे गडकिल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि सन्मानपूर्वक देखभाल. इतिहास जिवंत ठेवायचा असेल, तर केवळ स्मरणात नव्हे, तर कृतीतही तो उतरवायला हवा. कारण, संवर्धनाशिवाय वारसा केवळ आठवण बनून राहतो. या ऐतिहासिक यशाबद्दल भारत सरकार, पुरातत्व विभाग आणि इतिहास अभ्यासकांचे मनःपूर्वक आभार!, अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक्सवर केली आहे.