दिनेश अनंत कोळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
ठाणे : कोळी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देणारे, संघर्षशील आणि निष्ठावान कार्यकर्ता दिनेश अनंत कोळी यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कोळी समाज आणि कोळी समाजाचे मुखपत्र मासिक सागरशक्ती चळवळीची एक प्रेरणादायी ज्योत कायमची मावळली आहे. ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्याचे रहिवासी असलेले दिनेश कोळी हे एक सामान्य कार्यकर्ते नव्हते, तर चळवळीचा गाभा होते. शंकर आणि सुलोचना ठाणेकर या सक्रिय चळवळीतील समाजनिष्ठ दाम्पत्याच्या कार्याच्या ओढीने हा लहानपणापासूनच समाजकार्यात रमले.
कोळी समाजाच्या जागृतीसाठी आणि संघटनासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या या तरुणाने शिक्षण पूर्ण करून एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून नोकरी पत्करली, पण मन मात्र सतत समाजसेवेतच गुंतलेले राहिले. सागरशक्ती मासिकाच्या वितरणाची जबाबदारी त्याने अनेक वर्षे स्वतःच्या खांद्यावर घेतली. महाराष्ट्रातील विविध एसटी डेपोमधून कार्यकर्त्यांपर्यंत हे मासिक पोहोचवण्यासाठी तो जीव तोडून मेहनत करायचे त्यांना मासिक पोहोचलं का नाही याचीही तीव्र जबाबदारी महत्वाची वाटे.
कोणतेही आंदोलन असो, मेळावा असो, सभा असो, महाराष्ट्रात कुठेही कोळी समाजाची हाक आली, की दिनेश कोळी कोणतीही वाट न पाहता वाहन मिळेल त्या वाहनाने पोहोचतत असायचे, केवळ उपस्थित राहायचे नाही, तर तो प्रत्येक ठिकाणी कार्यशील, सतर्क, आणि सक्रिय असे. अशा या झपाटलेल्या कार्यकर्त्याने काही दिवसांपासून आजाराशी झुंज दिली, पण अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कोळी समाजाच्या चळवळीतील एक समर्पित, निःस्वार्थ आणि आधारस्तंभ हरपला आहे. आज समाजासाठी रात्रंदिवस झटणारा एक निःस्वार्थ योद्धा हरपला आहे, अशा संघर्षशील आणि निष्ठावान कार्यकर्ता दिनेश अनंत कोळी यांना अखेरचा सलाम.