सीए परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबई-ठाण्याच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

0

मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)कडून मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम, इंटरमिजिएट आणि फाऊंडेशन परीक्षांचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यामध्ये मुंबई आणि ठाण्याच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत देशपातळीवर अव्वल स्थान पटकावले आहे. अंतिम परीक्षेत मुंबईचा ‘टॉपर’ मुंबईच्या राजन काबरा याने सीए अंतिम परीक्षेत ६०० पैकी ५१६ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोलकाताच्या निशिता बोथ्रा हिने ५०३ गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला, तर मुंबईच्याच मानव शहा याने ४९३ गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.

अंतिम परीक्षेसाठी ग्रुप १ मध्ये ६६,९४३ विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यापैकी १४,९७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण २२.३८% इतके आहे. ग्रुप २ मध्ये ४६,१७३ विद्यार्थ्यांपैकी १२,२०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले (२६.४३%). दोन्ही ग्रुप्समधून एकत्र परीक्षा दिलेल्या २९,२८६ विद्यार्थ्यांपैकी ५,४९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याचे उत्तीर्णतेचे प्रमाण १८.७५% इतके आहे. इंटरमिजिएट परीक्षेत दिशाची चमक सीए इंटरमिजिएट परीक्षेत मुंबईच्या दिशा गोखरू हिने ६०० पैकी ५१३ गुण मिळवत देशात अव्वल क्रमांक पटकावला. त्यानंतर संदीप देविदान याने ५०३ गुणांसह दुसरा क्रमांक, तर जयपूरच्या यमिश जैन आणि उदयपूरच्या निलय डांगी यांनी प्रत्येकी ५०२ गुण मिळवत संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला.

इंटरमिजिएट परीक्षेत ग्रुप १ मधून ९७,०३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १४,२३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले (१४.६७%). ग्रुप २ मध्ये ७२,०६९ परीक्षार्थींपैकी १५,५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले (२१.५१%), तर दोन्ही ग्रुप दिलेल्या ३८,०२९ विद्यार्थ्यांपैकी ५,०२८ उत्तीर्ण झाले, ज्याचे उत्तीर्णतेचे प्रमाण १३.२२% आहे. फाऊंडेशन परीक्षेत वृंदा अगरवाल अव्वल : देशभरात ५५१ केंद्रांवर घेण्यात आलेल्या सीए फाऊंडेशन परीक्षेत गाझियाबादच्या वृंदा अगरवाल हिने ४०० पैकी ३६२ गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर मुंबईच्या यज्ञेश नारकर याने ३५९ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला, तर ठाण्याच्या डोंबिवली मधील शार्दुल विचारे याने ३५८ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.

या परीक्षेला एकूण ८२,६६२ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये १२,४७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे एकूण प्रमाण १५.०९% आहे. त्यामध्ये मुले १६.२६%, तर मुली १३.८०% यशस्वी ठरल्या आहेत. या निकालांतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, मुंबई आणि ठाणे येथील विद्यार्थ्यांची चार्टर्ड अकाउंटंसीच्या क्षेत्रातील तयारी आणि गुणवत्ता देशपातळीवर सर्वोत्तम आहे. भविष्यातील वित्त तज्ज्ञांची ही नवी फळी देशाच्या आर्थिक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी अपेक्षा आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech