मुंबई व ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा प्रचंड जल्लोष

0

गोविंदाच्या पथकाने रचले १० थरांचे विक्रम

मुंबई : राज्यभरात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबईत दादरमधील आयडिअल बूक डेपो, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनीसह ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव रंगतदार झाला, तर ठाण्यातही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसे, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान अशा अनेक ठिकाणी हंड्या फोडल्या गेल्या. यंदाही मुंबईसह ठाण्यात प्रेक्षक व सहभागींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मुंबईत मुसळधार पावसाच्या सत्रांदरम्यानही पुरुष आणि महिला गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी उत्साहपूर्ण प्रयत्न केले. ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान वतीने माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.“२० वर्ष परंपरेची, २० वर्ष अभिमानाची” असे बॅनर्स ठाण्यात दिसून आले.

हास्य जत्राच्या टीमने या दही हंडीला हजेरी लावत चार चाँद लावले तर मराठी कलाकार चेतना भट्ट हिला कलाकार हंडी फोडण्याचा मान मिळाला. ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचून जय जवान पथकाचा विक्रम मोडला. प्रताप सरनाईक यांच्या संकल्प प्रतिष्ठानमध्ये कोकण नगर गोविंदांनी १० थर रचून प्रेक्षकांना थक्क केले. यावेळी गोविंदांचे साहस, समन्वय आणि शौर्य दिसून आले. मुंबईतही कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचून विश्वविक्रम प्रस्थापित केला. छत्रपती गोविंदा पथकाने ९ थर रचण्याचा प्रयत्न केला असता, तो अपयशी ठरला, परंतु यंदाच्या उत्सवात विक्रमांचा स्पर्धात्मक उधाण कायम राहिला.

वरळी जांभोरी मैदानावरील परिवर्तन दहीहंडी २०२५ हा मुंबईतील सर्वात मोठा कार्यक्रम ठरला. याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, ऍड. संतोष पांडे यांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव रंगला. गोविंदा पथकाने छावा सिनेमातील दृश्यांचे सादरीकरण करत प्रेक्षकांमध्ये उत्साह पसरवला. छत्रपती संभाजीराजेंच्या शौर्याचे बलिदान मनोऱ्यावरील सादरीकरणातून दिसून आले, ज्यावर मुख्यमंत्री फडणवीसही भारावून गेले आणि त्यांनी टाळ्या वाजवून पथकाला दाद दिली. मुंबईत मागाठाणे येथील शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वे आयोजित हंडीत नृत्यांगना गौतमी पाटील आकर्षण ठरली. तीच्या नृत्याने गर्दीची उत्सुकता आणि ऊर्जा वाढवली. गोविंदाही त्यांच्या तालावर नाचताना दिसले. घाटकोपरमध्ये मनसे गणेश चुक्कल व अरविंद गिते मित्र परिवार आयोजित हंडीत जय जवान गोविंदा पथकाने १० थरांची दहीहंडी रचून सर्वांना थक्क केले.

यामुळे ठाण्यातील कोकण नगर गोविंदा पथकाचा विक्रम कायम मोडीत काढला गेला. या थरारक कामगिरीतून जय जवान पथकाने ठाम पणे पुन्हा एकदा दाखवून दिले – “गोविंदा पथकांचे खरे राजे आम्हीच”. देशभरात आज दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला. मुंबईत व ठाण्यातील गोविंदा पथकांनी उंचच उंच थर रचून उत्सवाची शोभा वाढवली आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. यंदाचा दहीहंडी उत्सव साहस, जल्लोष आणि उत्साह यांचा एकत्रित संगम ठरला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech