ठाणे : ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने हा परिसर वाहतूक कोंडीमुक्त करावा. तसेच रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी ठाण्यातील वाहतूक कोंडीसंदर्भात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी ठाणे घोडबंदर रोडवरील गायमुख घाटामध्ये होणाऱ्या वाहतूक समस्येबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात तात्काळ स्थळपाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, ठाणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता संजय कदम, तहसिलदार उमेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे, शाखा अभियंता प्रसाद सनगर व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
स्थळ पाहणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी पांचाळ यांनी याविषयी सविस्तर चर्चा व पुढील अॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात रात्री उशिरा बैठक घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, मिरा भाईंदर वाहतूक पोलीस निरिक्षक सागर इंगोले व इतर अधिकारी देखील उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पांचाळ म्हणाले की, रस्ते दुरुस्ती / वाहतूक कोंडी संदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवार, दि. ०८ ऑगस्ट २०२५ पासून रस्ते वाहतूक अंशतः ब्लॉक करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, मीरा भाईंदर बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, वनविभाग अशा सर्व विभागांनी आपापसात आवश्यक तो समन्वय राखून एकजुटीने या समस्येचे निराकरण पुढील पंधरा दिवसाच्या आत कोणत्याही परिस्थितीत करावे.
यादरम्यान संभाव्य पाऊस, वाहनांची वाहतूक या सर्व बाबींच्या अनुषंगाने विचारपूर्वक आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिले. तसेच ही सर्व कामे रस्ते सुरक्षा समितीच्या समन्वयाने तसेच अपघात होवू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा अवलंब करून मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.