ठाणे : उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चांगलाच रंगताना दिसतोय. ‘उठेगा नहीं साला’ या पुष्पा चित्रपटातील डायलॉगचा वापर करून उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना शिंदेंनीही तोच रोख कायम ठेवत, तितक्याच धारदार शब्दांत पलटवार केला. “उठण्याची भाषा कोण करतंय? त्यासाठी मनगटात जोर लागतो. केवळ तोंडाच्या वाफा सोडून उपयोग होत नाही,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ते ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.
“आज तीन वर्ष झालीत. त्या वेळी उठाव केला, तेव्हा फक्त दाढीवरून अर्धा हात फिरवला होता. त्यातून ते आडवे झाले आणि अजूनही सावरलेले नाहीत. आता पुन्हा एकदा उठण्याचा प्रयत्न करतायत, तोही कुणाच्या तरी हाताची मदत घेऊन!” अशी उपरोधिक टीकाही शिंदेंनी केली. शिंदेंचा स्पष्ट आरोप होता की, “एका नेत्याने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली, तर दुसऱ्याने मात्र सत्तेसाठीची मळमळ उघड केली. आम्ही ठरवलं होतं की कोणताही पक्षाचा झेंडा आणि अजेंडा नको – पण ते फक्त आम्ही पाळलं. दुसऱ्याने मात्र स्वार्थाचाच अजेंडा राबवला.”
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट)च्या अधिकृत एक्स हँडलवरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत एक तुलना मांडण्यात आली. या पोस्टमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना “स्वार्थी, खुर्चीप्रेमी” ठरवण्याचा प्रयत्न केला.
“एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक
एक उजवा, दुसरा डावा
एक धाकला असून थोरला,
दुसरा थोरला असून धाकला
एक मराठीप्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी
एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड
एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता
एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा
एकाचा मराठीचा वसा,
दुसरा भरतोय खिसा
एकाचा स्वतंत्र सवतासुभा,
दुसरा नुसताच आयतोबा!”
एकूणच, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे यांच्यातील शाब्दिक संघर्ष अधिकच तीव्र होणार हे स्पष्ट आहे. भाषणं, पोस्ट्स आणि टोलेबाजी यांमधून दोघेही आपापल्या भूमिकांना धार देत आहेत.