गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

0

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ह्युंदाई मोटरच्या ‘प्रोजेक्ट H२OPE’ (होप) उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस होता. त्यांच्या दूरदृष्टीतून आलेल्या या आवाहनाला ह्युंदाईने प्रतिसाद दिला आणि त्यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांतर्गत २५० शाळांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सामाजिक कल्याण व सामुदायिक विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या पुढाकाराचे अभिनंदन करीत या उपक्रमाचा अधिक विस्तार व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

दोन टप्प्यांमध्ये राबविलेल्या या उपक्रमांतर्गत मागील वर्षी पहिल्या टप्प्यात १०० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात यावर्षी अहेरी मध्ये ३५, भामरागड मध्ये १४, धानोरा मध्ये ३२, एटापल्ली मध्ये ३९, कोरची मध्ये १४ तर मुलचेरा मध्ये १६ अशा एकूण १५० शाळांमध्ये ही सुविधा मिळाली आहे. यामधून एकूण २६,३४१ विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे त्यांचे आरोग्य आणि शिक्षण यामध्ये सकारात्मक सुधारणा होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड ही एक आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी असून, ती शाश्वत विकासासाठी बांधिल आहे. या कंपनीने जलसंवर्धनासाठी ‘Project H२OPE अंतर्गत सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या सुविधा वाढवणे’ ही उपक्रमात्मक योजना गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये राबवली आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातील शासकीय शाळांमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील २५० शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला गेला असून, त्याचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १०० शाळा आणि दुसऱ्या टप्प्यात १५० शाळांची निवड करण्यात आली. या शाळांमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) युनिट्स, जलशीतक, सबमर्सिबल पंप, बोअरवेल्स आणि सहा थरांची साठवण टाकी बसवण्यात आली आहे. त्याचबरोबर जलसंवर्धन आणि स्वच्छतेबाबत जागरुकता सत्रे घेण्यात आली. ह्युंदाईने सीएसव्ही (CSV) धोरणांतर्गत या प्रकल्पासाठी एकूण ५.५ कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech