ठाणे : बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे. त्याच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे, पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी गटशेती, सेंद्रिय शेती, यांत्रिक शेतीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, त्यांच्याकरिता असलेल्या योजनांचा त्यांना जास्तीत जास्त लाभ द्यावा, याकरिता शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची ठाणे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेश मोरे, सुलभा गायकवाड, शांताराम मोरे, डॉ.बालाजी किणीकर या मान्यवर लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, प्र. उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सचिन चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, कोकण विभागीय कृषी सह संचालक बालाजी ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, तहसिलदार रेवण लेंभे तसेच विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. नदी, तलाव, बंधारे खोलीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी. खतांचा दर्जा जपावा. शेतकऱ्यांना बी-बियाणे वेळेवर उपलब्ध करून द्यावेत. बांबू, शेवगा, हळद, फणस, सुरण, आवाकाडो, ढोबळी मिरची या पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. जमिनीची पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे व त्याविषयी जनजागृती करावी.
मत्स्यपालनासाठी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये सामावून घ्यावे, बारमाही पिके घेता येतील असे नियोजन करावे. प्रगत शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज देण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यांनी सकारात्मक काम करावे, असे सांगून श्री.शिंदे पुढे म्हणाले की, बांबू, मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात करावी. शेती अवजारे योजना प्रभावीपणे राबवावी. आवश्यक तिथे वीज प्रतिरोधक यंत्रणा उभी करावी. रासायनिक खतांचा वापर कमी करावा. खतपुरवठा, बी-बियाणे पुरवठा करताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके नेमावेत. फळपिक विमा योजना व इतर पिक विमा योजनांच्या बाबतीत शेतकऱ्यांना अधिक जागरुक करावे. मुख्यमंत्री शाश्वत शेती योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड द्यावी.
पारंपारिक जलस्त्रोतातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी तसेच पाणी पुनर्भरण होण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्यात. “शासन आपल्या दारी” उपक्रमाचा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला, अशाच प्रकारचे अन्य लोकोपयोगी उपक्रम राबवावेत. “ॲग्रो टुरिझम” वर भर द्यावा. जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात करता यावा, यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, त्यादृष्टीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित व प्रशिक्षित करावे. विविध बँकांमार्फत ७०% खरीप पिक कर्ज वाटप करण्यात आलेले असून चालू खरीप हंगामात १००% कर्ज वाटपाचे नियोजन संबंधित यंत्रणांनी करावे. माती परीक्षण करून शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वेळेत देण्याबाबत नियोजन करावे. ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेमध्ये १००% शेतकरी खातेदारांची नोंदणी जून अखेर शेतकरी ओळख क्रमांक काढण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करावे आणि सर्व्हेक्षण वेळेत पूर्ण करावे. पीएम किसान (PM Kissan) योजनेमध्ये पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, याबाबत विशेष खबरदारी घ्यावी, असेही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे शेवटी म्हणाले.