केंद्र सरकारच्या निधीतून मांडा टिटवाळ्यातील आयुष्यमान भारत आरोग्य केंद्राचे भूमीपूजन
टिटवाळा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबवलेल्या आयुष्मान भारत योजनेचा खरा लाभ गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देशभरात आरोग्य केंद्रांची उभारणी केली जात असल्याचा विश्वास कल्याण पश्चिमेचे माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या निधीतून आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या पाठपुराव्याने मांडा टिटवाळ्यातील आयुष्यमान भारत आरोग्य केंद्राचा भूमीपूजन सोहळा दिमाखात संपन्न झाला.
“मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून देशभरात जनकल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये आयुष्मान भारत योजना ही सर्वसामान्य जनतेसाठी वरदान ठरली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वार्षिक पाच लाखांपर्यंत आरोग्य सहाय्य मिळते. एका घरातील पाच व्यक्तींसाठी २५ लाखांपर्यंत मदत मिळू शकते. ऑपरेशनपासून ते उपचारांपर्यंत सर्व सुविधा सरकारच्या मदतीने उपलब्ध होतात. या योजनेंतर्गतच टिटवाळा परिसरात हे आरोग्य केंद्र उभारले जात असून आसपासच्या परिसरातील हजारो गरजू लोकांना याचा नक्कीच लाभ होईल असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच नरेंद्र पवार यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकारच्या निधीतून उभे राहणारे हे केंद्र परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे नवे दालन ठरणार आहे. केंद्राच्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा आहे. या आरोग्य केंद्रामुळे स्थानिक नागरिकांना प्राथमिक उपचार, तपासणी आणि सरकारी आरोग्य योजनांचा लाभ सहज उपलब्ध होणार आहे. मोदी सरकारच्या योजनांमुळे आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात आरोग्य सेवा पोहोचत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
तर या आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा करणाऱ्या माजी उपमहापौर सौ. उपेशा शक्तिवान भोईर यांनी सांगितले की “केंद्र सरकारच्या निधीतून महाराष्ट्रभर साडेसातशेहून अधिक आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी केडीएमसी हद्दीत तब्बल ४५ केंद्रांची उभारणी होत आहे. त्यापैकी एक टिटवाळ्यात होत असून हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी भाजपा टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तीवान भोईर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, मा.नगसेवक सुरेश भोईर, मा.नगरसेवक बुधाराम सरनोबत, परेश गुजरे, किरण रोठे, दीपक कांबळे, रुपेश भोईर, विनायक भोईर, अनिल फड, विजय आव्हाड, संतोष शिंगोळे, हेमंत गायकवाड, यशोदा पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.