नवी दिल्ली : देशात मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूर, भूस्खलन आणि मानवी हानीची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांचा आकडा २२९ वर पोहोचला असून, सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. तर उत्तराखंडच्या धारली येथे ढगफुटीमुळे ६६ जण बेपत्ता असून ग्राउंड पेनिट्रेटिंग रडारने २० ठिकाणी संभाव्य अडकलेल्यांचे ठसे मिळाले आहेत. हवामान खात्याने जम्मू-काश्मीर, लडाख आणि तेलंगणासाठी रेड अलर्ट तर उत्तर प्रदेश, बिहारसह ८ राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
हिमाचल प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, राज्यात सध्या २१ भूस्खलन निरीक्षण केंद्र कार्यरत आहेत. गेल्या २४ तासांत ३९५ रस्ते, ६६९ वीज ट्रान्सफॉर्मर आणि ५२९ पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे राज्यात भूस्खलनाचा धोका वाढला आहे. उत्तराखंडच्या धारली येथे ढगफुटीनंतर नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. पुढील २४ तासांत राज्यातील ११ जिल्ह्यांत मध्यम ते उच्चस्तरीय पूराचा इशारा देण्यात आला असून, केदारनाथ, बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिब यात्राही १४ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसानंतर राजौरी, रिआसी आणि पुंछ जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या. रिआसी जिल्ह्यात तब्बल २८४ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने १५ ऑगस्टपर्यंत जम्मू विभागात पाऊस सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात ५५ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत असून, जोरदार वाऱ्यासह नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. मुरादाबादमध्ये रामगंगा नदीत पोलीस हवालदार वाहून गेले तर कानपूरमध्ये भाऊ-बहीण यांचा यमुनेत बुडून मृत्यू झाला. संभळ जिल्ह्यात गंगा नदीच्या तटबंदीला भगदाड पडून २० गाव पाण्याखाली गेले आहेत.
मध्य प्रदेशमध्ये पावसाची लाट १२ दिवसांपासून खंडित झाली असून, इंदूर-उज्जैन विभागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सोयाबीन पिक कोमेजू लागले आहे, तर जबलपूर, रीवा, सागर आणि शहडोल विभागात स्थिती तुलनेने चांगली आहे. बिहारमध्ये १२ जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. भागलपूरमध्ये गंगा नदीच्या पाण्यात १०० हून अधिक घरे बुडाली आहेत. पाटना, हाजीपूरसह ५ जिल्ह्यांत जोरदार पावसाने पाणी साचले असून १५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.