माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने गेल्या १० वर्षांपासून साजरा होतोय सामाजिक उपक्रम
कल्याण : आयुष्यात कौतुक आणि शाबासकी मिळाली की अडचणींशी लढायला, त्यांना हरवायला अजून हुरूप येतो असं म्हटलं जातं. आणि नेमका हाच धागा पकडून भारतीय जनता पक्ष जुने कल्याण मंडळ आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित १०वी-१२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदर सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने गेल्या १० वर्षांपासून अखंडपणे हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. तर गुजरातमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यानंतर या गुणगौरव सोहळ्याला प्रारंभ झाला.
यंदाचा हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणखीनच विशेष होता. कारण “ऊठ तरुणा जागा हो…युवा स्वाभिमानाचा धागा हो” या ब्रीद वाक्याखाली त्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे यंदाचा नुसता गुणगौरव सोहळाच नव्हता तर या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये असणारी देशभक्ती, देशप्रेमाची भावना आणखी वृद्धींगत करण्याचा कौतुकास्पद प्रयत्नही त्यातून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर इतर गुणगौरव सोहळ्यांपेक्षा हा सोहळा अधिक ठळक आणि तितकाच वेगळा ठरला. याअंतर्गत भाजपच्या जुन्या कल्याण मंडळामध्ये येणाऱ्या सर्व शाळांमधील दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आणि महाविद्यालयातील १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच यातील निवडक विद्यार्थ्यांना माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप जुने कल्याण मंडळ अध्यक्ष अमित धाक्रस आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता नरेंद्र पवार यांच्या हस्ते स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच आणि इयर बडससारख्या आकर्षक भेटवस्तूही प्रदान करण्यात आल्या.
१० वी आणि १२ वी ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची पायरी असते. आणि अशा महत्वाच्या पायरीवर त्याला शाबासकीची थाप मिळाली तर पुढे येणाऱ्या संकटांना तो विद्यार्थी अतिशय आत्मविश्वासाने सामोरा जाऊ शकतो. नेमका याच उद्देशाने साधारणपणे दहा वर्षांपूर्वी आम्ही हा सामाजिक उपक्रम सुरू केल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आपले वर्तमान कर्तृत्व हे भारत मातेच्या चरणी समर्पित होवो असे उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन करत शिकताना, आयुष्यात पुढे जात असताना या विद्यार्थ्याला आपल्या देशाबद्दलही आदर असलाच पाहिजे. तरच तो विद्यार्थी भविष्यात या देशाचा एक जबाबदार आणि देशप्रेमी नागरिक बनू शकतो. आपला देश तरुणांचा, विद्यार्थ्यांचा देश असल्याने हा विचार करून यंदा आम्ही “ऊठ तरुणा जागा हो युवा स्वाभिमानाचा धागा हो” ही संकल्पना राबवली. जेणेकरून या विद्यार्थ्यांमधील देशप्रेमाची आणि देशभक्तीची भावना सदैव जागृत राहील असे मतही पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान या कार्यक्रमात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या आई लक्ष्मी पिचाई यांनी आपल्या मुलासाठी केलेल्या त्यागावर आधारित एक लेख माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी उपस्थितांसमोर वाचून दाखवला. जो ऐकून यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यांच्या कडा आपसूकच पाणावल्या.
या गुणगौरव सोहळ्याला माजी आमदार नरेंद्र पवार, जुने कल्याण मंडल अध्यक्ष अमित धाक्रस, भाजपा जुने कल्याण मंडल महिला मोर्चा अध्यक्षा तथा कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार, माजी नगरसेवक सुरेश भोईर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, नवीन कल्याण मंडल अध्यक्ष स्वप्नील काटे, शिक्षक आघाडी प्रदेश संयोजक अनिल बोरनारे, जुने कल्याण मंडल सरचिटणीस विवेक वाणी, सरचिटणीस प्रताप टूमकर, युवा मोर्चा अध्यक्ष अनुजकुमार मिश्रा, जिल्हा सचिव सदानंद कोकणे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिपेश ढोणे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष रवि गुप्ता, गणेश पोखरकर, विलास पाटील, मारूती करंडे, सुरेश ओसवाल, बजरंग अग्रवाल, शिक्षक सेल संयोजक देवेंद्र ताम्हणे सर, जुने कल्याण मंडल उपाध्यक्ष विनोद मुथा, शैलेश नारकर, ॲड.समृद्ध ताडमारे, तेजस तेली, ॲड.विकास भुंडेरे, तानाजी कर्पे, प्रणव महाजन, निवेदिका यशोदा पाटील, दिपा शहा, प्रज्ञा बांगर, अनुजा लोहार, गौरी ताम्हणकर, अमृता लोखंडे, ज्योती गुडदे, यश निंबाळकर, अनिश महाजन, गिरीष ढोकीया, किशोर खैरनार, किशोर म्हस्के, निलेश राजे आदी मान्यवर, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.