उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी
महाबळेश्वर येथे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्सचे संमेलन (MAPCON) – २०२५ संपन्न
महाबळेश्वर : थंड हवेचं ठिकाण, स्ट्रॉबेरीची गोडी आणि डॉक्टरांचा महासमागम… अशा परिपूर्ण वातावरणात MAPCON 2025 च्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास हटके स्टाईलमध्ये भाषणाची चुरस चांगलीच वाढवली. “मी पेशाने डॉक्टर नाही… पण छोटी-मोठी राजकीय ऑपरेशन अगदी सहज करून टाकतो. महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं मोठं ऑपरेशन मी काही वर्षांपूर्वी यशस्वी केलं!” अशा भन्नाट वाक्याने सभागृहात हशा आणि टाळ्यांचा वर्षाव झाला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील हॉटेल ड्रीमलँड मध्ये महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स आयोजित संमेलन (MAPCON) – २०२५ पार पडले. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
डॉक्टरांचा मेळा आणि शिंदेंची राजकीय स्कॅल्पेल! : हॉटेल ड्रीमलँड, महाबळेश्वर येथे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स (MAPCON-2025) चे भव्य संमेलन पार पडले. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, जीवनगौरव पुरस्कार विजेते प्राप्त हृदय रोग तज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ, डॉक्टर विजयालक्ष्मी बाळेकुंद्रे, डॉक्टर अलका देशपांडे, डॉक्टर सुभाष वाघ, डॉक्टर प्रदीप सिंघल, अंजली राज्याध्यक्ष, डॉक्टर उमेश पिंगळे, डॉक्टर गिरीश राज्याध्यक्ष, डॉक्टर नारायण देवगावकर, बी.के. महावारकर, सुरेश शिंदे, जे. डी. पोळ, युवराज पवार, सुरेश चव्हाण, डॉक्टर, प्रसाद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
“डॉक्टर हृदय बरे करतात… मी लोकांचे ठोके वाढवतो!” : डॉ. हिरेमठ यांच्या ८ हजार हृदयांवर केलेल्या यशस्वी उपचारांचा गौरव करताना शिंदे म्हणाले “तुम्ही हृदय बरे करता… आणि आम्ही कधी कधी लोकांच्या हृदयाचे ठोके चुकवतोही! पण महाराष्ट्राच्या हितासाठी जे लागेल तेच करतो.”
कोविडच्या काळाची आठवण – PPE किटमध्ये फिरणारा ‘मंत्री रुग्ण’ कोविड काळातील भीषण आठवणी सांगताना शिंदे भावुक झाले. ते म्हणाले –मी स्वतः PPE किट घालून रुग्णांना भेटत होतो, रात्री १२ वाजता ऑक्सिजन संपत असल्याचे फोन यायचे, राज्यभर लहान-मोठे ऑक्सिजन प्लांट उभारले, डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं – तुम्ही देवदूत आहात. ‘महाबळेश्वरची हवा म्हणजेच नैसर्गिक थेरपी’ डॉक्टरांच्या तीन दिवसांच्या कॉन्फरन्सचा उल्लेख करत ते म्हणाले –“डॉक्टरही 24/7 काम करतात. म्हणून महाबळेश्वरची हवा तुमच्यासाठीही औषधच!”
विकास, राजकारण आणि हटके विनोद : भाषणात शिंदेंची खास शैली रंगली “मी गावाला आलो की विरोधकांचा स्ट्रेस वाढतो.” “सातारचे लोक कंदीपेढ्यासारखे गोड… आणि त्यांच्या हृदयात स्ट्रॉबेरी!” “मी डॉक्टर नसलो तरी राजकीय बायपास करतो.” विकास प्रकल्पांवरही त्यांनी भर दिला — कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, पुणे–नाशिक–नागपूर विकास, कल्याणकारी योजनांचा पाढा त्यांनी वाचला. AI, टेलीमेडिसिन आणि बदलती आरोग्यदृष्टी डॉक्टरांना उद्देशून शिंदेंचे आवाहन — “आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेलीमेडिसिन, ग्रामीण भागात पोहोचणाऱ्या सेवांचा विस्तार — हा काळ बदलण्याचा आहे.”
डॉक्टरांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन : शेवटी त्यांनी स्पष्ट केले — डॉक्टरांच्या कोणत्याही अडचणी शासनस्तरावर सोडवण्याची जबाबदारी माझी आहे आणि तुमचा ‘एक मिनिट’ जसा महत्त्वाचा, तसा तुमचा प्रश्न माझ्यासाठीही महत्त्वाचा आहे !” MAPCON मध्ये ‘राजकीय ऑपरेशन’चेही प्रात्यक्षिक! : महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात डॉक्टरांच्या परिषदेला उपमुख्यमंत्र्यांच्या राजकीय विनोदाचा तडका मिळाला. वैद्यकीय भाषेतून राजकीय संदेशन दिल्याने संमेलनाचा माहोलच बदलला!