उड्डाणपूलाचे मंगळवारी लोकार्पण
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेला कासारवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्यात असून उद्यापासून हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले, कासारवडवली उड्डाणपूलाच्या पहिल्या टप्प्यात डाव्या बाजूची मार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार असून या उड्डाणपूला वर ३०० मीमी जाडीचा एम-40 ग्रेड सिमेंट काँक्रीटी थर असून मध्यभागी असलेल्या भूयारी मार्गाच्या पृष्ठभागावर मॅट्रेसचा थर पसरवून सदर पुलाचे भक्कम बांधकाम करण्यात आले आहे.
या उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई तसेच जेएनपीटी, बोरीवली, वसई, विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच गुजरात ते जेएनपीटी दरम्यानच्या वाहतुकीस अडथळा न होता सुलभ मार्ग उपलब्ध होणार. या बरोबरच वाशी ते ठाणे, नवी मुंबई कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्गाच्या र्निर्मितीमुळे गायमुख ते वाघबिळ या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
दरम्यान विधिमंडळाचे अधिवेशन चालू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामकाजात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार उद्या दुपारी २ वाजता या कासारवडवली उड्डाणपूलाच्या उजव्यामार्गिकेचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी या नात्याने कासारवडवली, गायमुख, घोडबंदर या भागात उड्डाणपुल व्हावे ही मागणी मी स्वतः केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री व मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पला मंजुरी होती. तथापि या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
घोडबंदर मार्गावरील तीव्र वाहतूक भार लक्षात घेता उड्डाणपूल दोन टप्प्यांमध्ये बांधण्यात येत आहे. पहिला टप्प्यात डावीकडील बाजू (ठाण्याकडून गाईमुखकडे) पूर्ण झाली असून उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उजवीकडील बाजूची (गायमुखकडून ठाणेकडे) पावसाळ्यानंतर स्थापत्य कामे हाती घेण्यात येणार आहेत.